चंद्रावर जाऊन देशाने इतिहास रचला...! अन् देशातला नागरिक महागाईने खचला..!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

चंद्रावर जाऊन देशाने इतिहास रचला...! अन् देशातला नागरिक महागाईने खचला..!!

 चंद्रावर जाऊन देशाने इतिहास रचला...! 

अन् देशातला  नागरिक महागाईने खचला..!! 


सोलापूर कटूसत्यवृत्त (दादासाहेब नीळ) :-अनेक वर्ष काँग्रेसने सत्ता उपभोगल्यानंतर एक बदल म्हणून मतदारांनी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार निवडून दिले. सत्ता स्थापन करण्याच्या अगोदर भाजपाने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड मोठी आश्वासन देऊन भुलभुलय्या केला.  त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत सुद्धा भाजपाने पुन्हा काँग्रेसवर खापर फोडून फार मोठी घाण काँग्रेसने करून ठेवली आहे आणि ती स्वच्छ करण्यासाठी आम्हाला आणखी पाच वर्ष लागतील. अशी बतावणी करत पुन्हा एकदा केंद्राची सत्ता ताब्यात घेतली. 

परंतु केंद्रात मिळालेल्या सत्तेचा वापर भाजपाने अर्थातच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी,  कष्टकरी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी करणं गरजेचं असताना भारतीय जनता पक्षाकडून या सत्तेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत गेला.  भारताचे चंद्रयान - 3 चंद्रावर पोचल्यामुळे भारताची जगात कॉलर टाइट झाली. याचा सर्वच देशवासीयांना निश्चितच अभिमान आहे. परंतु देशात वाढलेली महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याऐवजी या भाजपा सरकारने सत्तेच्या बळावर ईडी ,सीबीआय यासारख्या संस्थांच्या माध्यमातून फक्त  विरोधी पक्षाचे पंख छाटण्याचाच मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसतोय. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना संपवण्याचे काम सुद्धा या पक्षांकडून सत्तेच्या बळावर होताना दिसत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या छत्रपती शिवरायांचा विचार महत्त्वाचा मानून राज्यकारभार करणे गरजेचे आहे.  कारण  छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सत्ता ही एका वंशासाठी किंवा कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी कधीच वापरले नाही.  तर  छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तेचा वापर गोरगरीब जनतेसाठी केला आणि त्यांच्यासाठीच संपूर्ण आयुष्य वेचलं. 

त्याचबरोबर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनीही आपली संपूर्ण संपत्ती गोरगरिबांच्या हितासाठी दान केली. एवढेच नव्हे तर समाजातील रंजल्या गांजलेल्या माणसांना उभं करण्याचं काम सुद्धा याच महाराष्ट्रातील या महापुरुषांनी केलं. 

त्यांच्या या कार्याचा आदर्श घेण्याची खरी गरज असताना आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार या महापुरुषांच्या विचारांच्या उलट काम करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संतोष व्यक्त होत आहे. सत्ता आणि पैशाचा बाजार मांडून आणि शासकीय संस्थांची भीती दाखवून प्रादेशिक पक्षांना आणि मित्र पक्षांना सुद्धा कधी सत्तेचा गाजर तर कधी भय आणि भीतीचा भोपळा दाखवून हे सरकार अनेक नेत्यांना आपल्या पक्षाच्या दावणीत बांधू लागलं आहे. 

संपूर्ण देशातील आणि राज्या राज्यातील जनता आज महागाई आणि बेकारीने पूर्णपणे तडफडू लागलेली आहे. परंतु हे सरकार याकडे लक्ष न देता फक्त निवडणुका आणि राजकारण याकडेच अधिक लक्ष देत आहे. याशिवाय उत्तर पूर्व भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दंगली भडकत आहेत. त्या दंगली भडकविणारा ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी हे सरकार प्रयत्न का प्रयत्न करत नाही. 

गेल्या दोन-चार महिन्यापासून मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये फार मोठा संघर्ष उफाळून आला आहे. त्या ठिकाणी आया -बहिणींचे व्हिडिओ काढून व्हायरल ही झाले.  आया- बहिणीची अब्रू वेशीला टांगली.  या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यायला आणि त्यावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ आणि शब्द सुद्धा नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मागच्या दोन-तीन वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी तब्बल एक वर्ष  आंदोलन केलं. त्या आंदोलनाकडे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये असून सुद्धा ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशामध्ये आजवरच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही. 

एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी हे सरकार उदासीन असल्याचं त्यांच्या धोरणावरून लक्षात येत आहे. कारण साखरेच्या निर्यातीवर कर वाढवण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला जात आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची मागणी कमी होणार आहे.  त्यामुळे  उसाचे दर कोसळण्याची भीती शेतकऱ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यातून सरकारच्या या धोरणांना तीव्र विरोध होताना दिसतोय. मोठमोठ्या व्यापाऱ्यांना हाताशी धरून हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे.  कारण या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव नाही. 

सरकारच्या या तुगलकी कारभाराचा शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसत असून शेतकरी पुन्हा एकदा आत्महत्या कडे वळू लागला असून महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढू लागल्या आहेत. हे सरकारचं  दुर्दैव म्हणावे लागेल..! 

भारताने चांद्रयान - 3 ही मोहीम यशस्वी करून एक फार मोठा इतिहास रचला...!  सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे या देशातला नागरिक आणि शेतकरी मात्र खचला ....!!असे म्हणण्याची वेळ  तमाम शेतकरी आणि नागरिकांवर आलेली आहे. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages