सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा !

 सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा !

उजनीत केवळ १३ टक्केच पाणी; 'खरीप'साठी पाणी नाहीच


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेसह बार्शी, करमाळा, कुर्डुवाडी या नगरपालिका व इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत-जामखेडचा पाणीपुरवठा उजनीवर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १०० ग्रामपंचायतींनाही उजनीचाच आधार आहे. पावसाचा मोठा खंड पडल्याने उजनीतील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. खरीप हंगामासाठी पाणी सोडणे सद्य:स्थितीत कठीण असल्याने ऐन पावसाळ्यात जिल्ह्यावर दुष्काळाचे (पाणी टंचाई) सावट निर्माण झाले आहे.

सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. दुसरीकडे बारामती, इंदापूर, सोलापूर येथील एमआयडीसींनाही उजनीतूनच पाणी जाते. तसेच उजनी धरणावर अंदाजे ३५ लाख लोकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो.

गतवर्षी २४ ऑगस्टपर्यंत उजनी धरण ९९ टक्क्यांपर्यंत भरले होते आणि दौंडवरून २२ हजार क्युसेकचा विसर्ग धरणात येत असल्याने कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनेसह नदीतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडला जात होता. पण, यंदा स्थिती चिंताजनक असून धरण अद्याप १३ टक्क्यांवरच स्थिर असून सात मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे.

हवामान खात्यासह तज्ज्ञांचे अंदाज हुकल्याने आता उजनीतील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाऊस कधी पडेल हे निश्चित नसल्याने खरीप पिकांची स्थिती चिंताजनक असतानाही शेतीला पाणी सोडले जाणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सोलापूर शहरासाठी २५ सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा औज बंधाऱ्यात आहे, पण पाऊस न पडल्यास उजनीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागेल, असा मुद्दा मांडला. नदीतून एक आवर्तन सोडताना तब्बल सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. पाऊस न झाल्यास २० सप्टेंबरनंतर सोलापूरसाठी पाणी सोडावेच लागणार आहे.

पंढरपूर शहराचा पाणीपुरवठा चंद्रभागा नदीवर अवलंबून आहे. सध्या शहराजवळील बंधाऱ्याने तळ गाठला असून उजनीतून पंढरपूर शहरासाठी पाणी सोडावे, असे पत्र नगरपालिकेच्या वतीने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत उजनीतून पंढरपूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडावेच लागणार आहे. त्यासाठी साधारणतः: दीड ते दोन टीएमसी पाणी सोडावे लागते.

उजनी धरणाच्या बॅकवाटरवर १२ हजार शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. उजनीच्या बॅकवाटरवर या परिसरातील ३३ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळते. आता पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले जाऊ शकते. तसा अंतिम निर्णय झाल्यास त्यावेळी बॅकवाटर परिसरातील वीजपुरवठा पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

१९७२ च्या दुष्काळानंतर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या उजनी धरणाची उभारणी झाली. १ जून १९८० मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. दरम्यान, यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला सोलापूर जिल्ह्यात विशेषतः धरण क्षेत्रात आणि पुणे जिल्ह्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरण अजूनही प्लस १३.२२ टक्क्यांवरच आहे. पावसात २३ दिवसांचा खंड पडल्याने आता पंढरपूरसाठी साधारणतः दीड ते दोन टीएमसी तर सोलापूर शहरासाठी सहा टीएमसीचे एक आवर्तन नदीतून सोडावे लागणार आहे. इतर शहरांसह औद्योगिक वसाहती व बॅकवाटरला उजनीचाच आधार आहे. आणखी २० दिवस पाऊस न पडल्यास आतापर्यंतच्या धरणाच्या इतिहासात ऐन पावसाळ्यात उजनी उणे होण्याचे २०२३ हे पहिलेच वर्ष ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages