हास्यचित्रे आणि गीतांची विद्यार्थ्यांना अनोखी मेजवाणी !
संगमनेर (कटूसत्य वृत्त):-मार्मिक संदेश देणारी व्यंगचित्रे आणि सीमा देव यांच्यावर चित्रित झालेल्या गीत गायनातून अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर आणि सुमधुर आवाजाच्या मंगला पराशर यांनी विद्यार्थ्यांना या अनोख्या मेजवानीची भेट दिली. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अरविंद गाडेकर यांनी प्रथम व्यंगचित्राचा अर्थ, इतिहास, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रात्यक्षिकासह व्यंगचित्र कसे काढले जाते हे दाखविले. विद्यार्थ्यांनाही पुढे येऊन बोर्डवर व्यंगचित्रे काढण्यास प्रोत्साहित केले. चेहऱ्यावरील विविध हावभाव साध्या सोप्यारेषातून कसे व्यक्त करता येतात ते मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगितले. व्यंगचित्रांचे प्रकार ,विविध व्यंगचित्रकारांची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. विशेषता व्यंगचित्रातूनही महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवता येतो हे उदाहरणांनी दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. अरविंदजी यांनी चित्रकलेची ही वेगळी बाजू विद्यार्थ्यांसमोर उलगडली. व्यंगचित्र कसे समजून घ्यावे यावर चर्चा केली. सोबत आणलेली विविध व्यंगचित्रे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुली केली. मंगला पाराशर यांनी अभिनेत्री सीमा देव यांच्यावर चित्रित झालेले तुला पाहते रे आणि बाई मी विकत घेतला शाम ही गीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. गीतांच्या आधी या गीतांमधील शब्दांचा नेमका अर्थ, शब्द सामर्थ्य व त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना आपल्या निवेदनात प्राचार्य मुकुंद डांगे यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट केल्या. विद्यालयातील कलाशिक्षक एकनाथ विरकर यांनी अरविंदजी यांचा स्नेह भेट देऊन सत्कार केला तसेच तथागत रोकडे यांनी मंगला पाराशर यांना स्नेह भेट देऊन सत्कार केला. विद्यालयाच्या निसर्गरम्य प्रांगणात विद्यार्थ्यांनी या अनोख्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

No comments:
Post a Comment