डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या खूनाच्या तपासात दहा वर्षाची दिरंगाई ; मोहोळ अंनिस शाखेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृणपणे खुन करण्यात आला,त्या घटनेस दहा वर्षे झाली तरीही खुन्याचा तपास नाही. तपासात होणाऱ्या टोकाच्या दिरंगाई बाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,शाखा मोहोळच्या वतीने मोहोळचे तहसिलदार भालचंद यादव यांच्या मार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात खुन झाला.या घटनेला यावर्षी दहावर्ष पूर्ण झाली आहेत.त्यानंतर प्रसिद्ध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ त्याच पद्धतीने मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली. शहीद डॉ.दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य फुले,शाहू,आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या विचारवंतांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात खर्च करून महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारात भर घातली आहे.आपण एका बाजूला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असे म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांचे खून होतात ,हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही.डॉ.एम एम कलबुर्गी हे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि संशोधक होते. तसेच ते हम्पी विद्यापीठ,कर्नाटकचे कुलगुरू होते.साहित्य अकादमीचा २००६ साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.लिंगायत विचार धारेतील ते पुरोगामी विचारवंत होते. त्यांनी अंधश्रद्धांना कडाडून विरोध केला होता.त्यांची धारवाड येथे ३० ऑगस्ट २०१५ रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या झाली.
गौरी लंकेश या बेंगलोर, कर्नाटक मधील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता होत्या.गौरी लंकेश 'पत्रिका' नावाच्या साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या.धार्मिक मुलतत्ववादी,अंधश्रद्धा आणि जातीय भेद यांच्या विरोधी त्या सातत्याने लिहीत होत्या.स्त्री चळवळीत सुध्दा त्यांचा सहभाग असे. या कामांसाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता.त्यांचाही ५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांच्या घराबाहेर खून करण्यात आला.
* सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र
कडक कायदा करावा.या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भेटीची तारीख व वेळ द्यावी आणि मा. पंतप्रधान यांची भेटीची तारीख व वेळ मिळण्यास आपण शिफारस करावी. - राज्य सरचिटणीस-सुधाकर काशीद.*
मोहोळचे तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत . निवेदनावर राज्याध्यक्ष अविनाश पाटील,राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे,राज्यसरचिटणीस सुधाकर काशीद,जिल्हाकार्याध्यक्ष धर्मराज चवरे आदींच्या सह्या आहेत.यावेळी मोहोळ तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे शाखा अध्यक्ष प्रा. श्रीधर उन्हाळे, कार्याध्यक्ष मोहन व्यवहारे,आकाश फाटे,मनोज मोरे,आकाश कापुरे, विजयकुमार चांदणे,संजय लोंढे, रमेश आदलिंगे,प्रदीप माळी,दीपक पारडे,बिरमल खांडेकर,संदीप साळवे,रमेश साठे,संजय भोसले, एकनाथ कुंभार,नवनाथ साळी, मनोहर गोडसे,अभिजीत मोटे,राहुल तावसकर,सुरेश पवार,शशिकांत शिंदे व रामचंद्र खांडेकर आदी उपस्थित होते .

No comments:
Post a Comment