मोहोळच्या सैनिकपत्नी सीमा पाटील यांचा उपक्रम; सातशे महिलांना स्वखर्चाने पंढरी दर्शन
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय सैन्य दलातील दिवंगत जवान सुभाष पाटील यांच्या पत्नी तथा मोहोळच्या माजी नगरसेविका सीमा पाटील यांनी स्वखर्चाने अधिकमासानिमित्त मोहोळच्या सुमारे सातशे महिलांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडविण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला असून त्यांच्या या " पंढरी दर्शन" सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिकमासारंभ सुरू झाल्यापासून पंढरपूर नगरीत मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल-रुक्मिणी ,भक्त पुंडलिक दर्शनासाठी व चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. विशेषत: महिलांना इच्छा असूनही दैनंदिन जीवनातील घरकामामुळे त्यांना शक्य नसते.याबाबीची खंत सामाजिक कार्यकर्त्या तथा भारतीय सैनिक पत्नी सीमा पाटील यांनी ओळखून मोहोळच्या महिलांना" पंढरी दर्शन " घडविण्याचा संकल्प केला. त्यांनी आतापर्यंत आठ बसेसच्या माध्यमातून सुमारे सातशे महिलांना स्वखर्चाने अधिकमासानिमित्त पंढरी दर्शन घडवले आहे. मोहोळ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांच्या त्या भगिनी आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारे हे कुटुंब आहे अशी भावना उपस्थित महिला व्यक्त करताना दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून प्रत्येक बस फेरीत महिलां सोबत स्वतः सहभागी होऊन टाळ मृदंगाच्या निनादात "माऊली माऊलीचा" जयघोष करीत विठ्ठल -रुक्मिणी दर्शन, भक्त पुंडलिक मंदिर दर्शन, चंद्रभागेत पवित्र स्नान, व नौका विहार,सहभोजन,अभंग, फुगडी आदींचा सहभाग असल्याने महिलांचा अंतःकरणपूर्वक आनंद द्विगुणित करण्याचे काम सीमा पाटील करीत आहेत. या महिलांच्या दृष्टीने सीमा पाटील यांनी सुरू केलेला पंढरीदर्शनचा उपक्रम अविस्मरणीय असाच ठरत आहे.या उपक्रमास महिलांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
.png)
No comments:
Post a Comment