राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातर्गंत विविध लाभासाठी 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- “राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-24 अतर्गंत योजनेतील विविध लाभासांठी शेतकरी उत्पादक गट ,कंपनी व वैयक्तीक शेतकरी यांनी तालुकास्तरावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
या अभियानात गोदाम बांधकाम,बीज प्रक्रिया संच, बीज प्रक्रिया करण्यासाठी ड्रम व यंत्र खरेदी, अन्नधान्य साठवणुकीसाठी कोठी (कणगी) आदी विविध साधनांसाठी अनुदान दिले जाते.
गोदाम बांधकाम- अन्नधान्य उत्पादनाच्या सुधारित साठवणुकीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. या योजनेत 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. बॅंकेने कर्ज मंजुर केल्यानंतर अर्जदार पात्र ठरेल. यासाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना व नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे.
बिजप्रक्रिया संच - उत्पादीत बियाणावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बिज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी (यंत्र सामुग्री व बांधकामासाठी ) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा रुपये 10 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.
शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम /यंत्र - बियाण्यास मोठ्या प्रमाणावर बिज प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी गटामार्फत बिज प्रक्रिया ड्रम व यंत्र खरेदीसाठी 8 हजार रुपये प्रति युनिट किंवा किंमतीच्या 50 टक्के अनुदान अनुज्ञेय आहे.
अन्नधान्य साठवणुकीसाठी कोठी (कणगी) - अन्नधान्य साठवणुक करण्यासाठी वैयक्तीक लाभार्थ्यास ५ क्विंटल मर्यादेत कोठीसाठी (कणगी) किंमतीच्या 50 टक्के किंवा दोन हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.
वरील सर्व बाबीसाठी शेतकरी उत्पादक संघ व कंपनी तसेच वैयक्तीक शेतकरी यांनी पात्र आवश्यक बाबीसाठी तालुकास्तरावर ऑफलाईन पद्धतीने दिनांक 30 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे,
No comments:
Post a Comment