आज मराठा सेवा संघ ३२ वर्षाचा होतोय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 1, 2022

आज मराठा सेवा संघ ३२ वर्षाचा होतोय

आज मराठा सेवा संघ ३२ वर्षाचा होतोय
#मराठा_सेवा_संघ हा शब्द वाचला की अनेकांना प्रश्न पडतो, ही नेमकी कसली संस्था आहे ? त्यांचे काम काय आहे ? त्यांच्या माहितीसाठी हा थोडासा लेखनप्रपंच..
१९९० सालापासुन मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार अशी ओळख धारण करणारी संस्था आहे. खरंतर मराठा सेवा संघाने नेमकं कोणतं कार्य केले हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कधीही पडत नाही. परंतु समाजातील धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवणाऱ्या विघातक प्रवृत्तींनी सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठा सेवा संघ आणि त्याचे वास्तविक विचार पोहोचू नयेत म्हणून त्याविषयी जी बदनामीची मोहिम राबविली, जो अपप्रचार केला, जे चुकीचे चित्र समाजासमोर उभे केले त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मराठा सेवा संघाचे उद्देश्य आणि कार्य याविषयी प्रश्न पडणे साहजिक आहे. मराठा सेवा संघाच्या कार्याविषयी थोडक्यात घेतलेला हा आढावा वाचुन लोकांच्या माहितीत थोडी जरी भर पडली तर या लिखाणामागचा उद्देश साध्य झाला म्हणता येईल...

मराठा सेवा संघाने काय केले ?
“महाराष्ट्राच्या सामाजिक भुमीची नव्याने मशागत केली...
समाजाला
“जय जिजाऊ जय शिवराय”,
“एक मराठा लाख मराठा”
अशी आपुलकीची घोषवाक्यं दिली...
राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला “जय जिजाऊ” असे अभिवादनमुल्य प्राप्त करुन देऊन लाखो लोकांना एकत्र आणले...
पूर्वी राष्ट्रमाता जिजाऊंचे कोणतेही चित्र उपलब्ध नव्हते, त्यांचे तैलचित्र बनवुन ते अधिकृत करुन राज्याच्या मंत्रालयात लावुन घेतले...
विधानसभेत शिवजयंतीच्या तारखेच्या वादावर चर्चा घडवुन १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख निश्चित करुन घेतली...
१२ जानेवारी जिजाऊजयंती सिंदखेडराजा
१९ फेब्रुवारी शिवजयंती किल्ले शिवनेरी
१४ मे शंभुजयंती किल्ले पुरंदर
६ जुन शिवराज्याभिषेक किल्ले रायगड
हे उत्सव सुरु केले...
२९ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणुन साजरा करण्यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला...
पानिपतच्या युद्धातुन वाचलेले रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांचा मराठा मिलन समारोह घडवुन आणला...
धार्मिक, जातीय विद्वेषातुन दगडं उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तके दिली आणि महाराष्ट्रातील जातीय सलोखा वाढविला...
इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभा करुन इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांवर दहशत बसविली...
महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जाणाऱ्या लेखक, वक्ते, शाहीर, कलाकारांची मोठी फळी निर्माण केली...
लेखकांना वाचकवर्ग दिला
वक्त्यांना श्रोतावर्ग दिला
कलाकारांना प्रेक्षकवर्ग दिला
महाराष्ट्राला वैचारिकवर्ग दिला...
धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी “शिवधर्म गाथा” दिली.
आपली नाणी, वाणी, लेखणी आणि करणी आपण आपल्याच लोकांविरोधात वापरु नये ही आचारसंहिता दिली...
युवकांना बुटाच्या पॉलिशपासुन डोक्याच्या मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची दृष्टी दिली...
धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, प्रचारप्रसारमाध्यमसत्ता यांचे महत्व समाजाला पटवुन दिले...
अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि न्युनगंड ही समाजाच्या अधोगतीची कारणे आहेत याची समाजाला जाणीव करुन दिली...
समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध-तुकोबा-शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही साखळी समजावुन सांगितली...”
मराठा सेवा संघाचे कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येते, तितकेच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडला आहे.
आज माझ्यासारखे जे अनेक युवक वेगवगेळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात, त्यासाठी मराठा सेवा संघाचा खूप मोठा आधार राहिलेला आहे.
अशा या मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनाच्या सर्व सहकाऱ्यांना आणि समाजबांधवांना हार्दिक शुभेच्छा..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages