डॉ. दीक्षित, प्रा. देवळाणकर अन् दिग्पाल लांजेकरांच्या व्याख्यानांची मेजवानी; जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सव व्याख्यानमाला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 26, 2022

डॉ. दीक्षित, प्रा. देवळाणकर अन् दिग्पाल लांजेकरांच्या व्याख्यानांची मेजवानी; जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सव व्याख्यानमाला

 डॉ. दीक्षित, प्रा. देवळाणकर अन् दिग्पाल लांजेकरांच्या व्याख्यानांची मेजवानी


जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सव व्याख्यानमाला



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त १ ते ६ सप्टेंबर दरम्यान बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. हुतात्मा स्मृती मंदिरात दररोज सायंकाळी ६.३० वाजता हि व्याख्याने होणार आहेत. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेचे हे 46 वे वर्ष आहे.


अध्यक्ष कुलकर्णी म्हणाले, व्याख्यानमालेचे उद्घाटन गुरुवारी, (१ सप्टेंबर) सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या यांचे हस्ते व बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग यांच्या अध्यक्षतेखाली होईल.  दिनांक १ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेतील पहिले पुष्प डॉ. जगन्नाथ दीक्षित (पुणे) हे गुंफणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे डॉ.जगन्नाथ दिक्षित ‘जीवनशैली बदलातून वेट लॉस व मधुमेह मुक्ती’ या विषयावर सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. दीक्षित यांच्या बहुमुल्य योगदानाबद्दल आजवर त्यांना ३ राष्ट्रीय व ५ राज्य स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. डब्ल्यूएचओ  आणि युनीसेफसाठी सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे.

शुक्रवार २ सप्टेंबर रोजी रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोदजी बापट (मुंबई) हे व ‘स्वराज्य पंच्याहत्तरी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. साहित्य – संस्कृती- इतिहास – कला आदी विषयांवर ते विविध साप्ताहिक व मासिकांमधून लेखन करीत असतात तसेच वरील विषयांवर ते व्याख्याने देखील देत देतात. रा. स्व. संघाचे कार्यकर्ता म्हणून गेली पस्तीस वर्षे ते सातत्याने कार्यरत आहेत.

शनिवार, ३ सप्टेंबर रोजी गोव्याचे लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती अंबादास  जोशी (पणजी) हे ‘न्यायालये, न्याय व समाज’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. आजवरच्या कायदे विषयक कारकिर्दीत त्यांनी सहाय्यक सरकारी वकील, अतिरिक्त सरकारी वकील, कनिष्ठ न्यायाधीश, वरिष्ठ न्यायाधीश या पदांवर काम केले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

व्याख्यानमालेचे चौथे पुष्प रविवार ४ सप्टेंबर रोजी प्रा. शैलेन्द्र देवळाणकर (मुंबई) हे ‘भारतीय परराष्ट्र धोरणाची ७५ वर्षे’ या विषयावर गुंफणार आहेत. प्रा. देवळाणकर हे परराष्ट्र धोरणाचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी एम. ए. मध्ये प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक प्राप्त केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसमध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग एक अधिकारीपदी निवड झाली होती. त्यांना प्रशासकीय व शिक्षण क्षेत्रातील २२ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आजवर २० पुस्तकांचे लेखन, संकलन व प्रकाशन केले आहे.

नीलिमा देशपांडे (कोल्हापूर) या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प सोमवार, ५ सप्टेंबर रोजी गुंफणार आहेत. ‘होम स्कूलिंग मूल्यवर्धित शिक्षण’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. नीलिमा देशपांडे या अनुवादक व टेक्निकल कटेंट रायटर म्हणून सर्वश्रुत आहेत. मुलांना चौकटी बाहेरची शाळा आणि निसर्गात पसरलेले अथांग ज्ञान हसत खेळत वेचता यावे, या भूमिकेतून त्यांच्या ‘रमा एज्युकल्चरल टुरिझम’ चा जन्म झाला. ‘होम स्कुलिंग’ शिक्षणातील एक अपारंपारिक मार्ग निवडून त्यांनी स्वतःच्या मुलीला दहावीपर्यंतचे शिक्षण घरीच दिले आहे व ते यशस्वी करून देखील दाखवले आहे.

व्याख्यानमालेची दमदार सांगता मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर (पुणे ) यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे. जाणता राजा महानाट्यात शाहिराची तसेच फर्जंद चित्रपटात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची भूमिका केलेले ॲड. आनंद देशपांडे हे श्री. लांजेकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. दिग्पाल लांजेकर हे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. श्री शिवराजअष्टक या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या व त्यांच्या पराक्रमी वीरांच्या पराक्रमावर आधारित चित्रपट मालिकेचा संकल्प केलेला आहे. त्यातील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चार चित्रपटांचे लोकार्पण झाले आहे. हे चित्रपट राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले नावाजलेले चित्रपट आहेत. तू माझा सांगाती, सखी, ज्ञानेशवर माउली, इत्यादी अशा लोकप्रिय मालिकांचे २००० हून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले आहे. 

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेस सोलापूरकरांनी हजेरी लावावी व व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन नितिन कुलकर्णी यांनी केले.  या पत्रकार परिषदेस बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग, उपाध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक प्राचार्य गजानन धरणे, ॲड. प्रदीपसिंह राजपूत, पुरुषोत्तम उडता, चंद्रिका चौहान, राजेश पवार, आनंद कुलकर्णी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापिका अंजली कुलकर्णी, कर्ज विभागाचे मुख्याधिकारी जयप्रकाश नादरगी, मंडळाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे आदी उपस्थित होते.


बौद्धिक व्याख्यानमाला संकल्पना रुजवली जनता बँकेने

बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग म्हणाले, सोलापुरात “बौद्धिक व्याख्यानमाला” ही संकल्पना सोलापूर जनता सहकारी बँकेने रुजवली, जपली. त्यातून एक श्रोतृवर्ग तयार झाला. अर्थकारणासोबतच विविध उपक्रमांतून समाजप्रबोधन करण्याचा वसा गेली ५६ वर्षे बँकेने अविरत चालू ठेवला आहे. समाजाला सर्वांगीण विकसीत करण्याच्या प्रयत्नात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेने विविध क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासू मान्यवरांचे विचारधन मंडळाच्यावतीने या व्याख्यानमालेद्वारे देण्याचा प्रयत्न असतो. यंदाच्यावर्षीही विविध विषयांवरील विचारपुष्पांची गुंफण करीत व्याख्याते ही व्याख्यानमाला श्रीगणेशचरणी अर्पण करणार आहेत, असे व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages