पक्षश्रेष्ठींनी फाटक्या लोकांना ताकद दिल्यास तिसरेच घडेल पश्चातापाची वेळ येईल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

पक्षश्रेष्ठींनी फाटक्या लोकांना ताकद दिल्यास तिसरेच घडेल पश्चातापाची वेळ येईल

पक्षश्रेष्ठींनी फाटक्या लोकांना ताकद दिल्यास तिसरेच घडेल पश्चातापाची वेळ येईल

जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांचा सुचक इशारा

अनगर येथे १०५ सोसायटी पदाधिकाऱ्यांचा सत्मान सोहळा

                    मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून राजन पाटील यांच्या सारखे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या निष्ठेच्या विचारधारेने काम करत आले आहेत. माजी आमदार पाटील आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी अत्यंत सचोटीने आणि निष्ठेने पक्षकार्य केल्यामुळेच मोहोळ मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनू शकला. मात्र काही उपटसुंभ लोक प्रत्येक तालुक्यात येतात काहीही गप्पा मारतात. पक्षाचे वरिष्ठ नेते तरीही अशा फाटक्या लोकांना गटबाजीच्या धोरणाने जाणीवपूर्वक ताकद देऊन निष्ठेच्या राजकारणाला दुर्लक्षित करत आहेत. सातत्याने हे असेच होत राहिले तर राजकारणात तिसरेच काही तरी होऊन दिशाहीन उपटसुंभ लोकांना ताकद देणाऱ्या या वरिष्ठ नेत्यांच्या हातात पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही.असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी अनगर येथे दिला.

                    अनगर(ता.मोहोळ)येथे लोकनेते कै. बाबूराव(आण्णा)पाटील यांच्या जयंती निमित्त मोहोळ तालुक्यातील विकास सोसायटीच्या नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन यांचा भव्य सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष साठे बोलत होते.

                    यावेळी व्यासपीठावर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार राजन पाटील,आमदार यशवंत माने, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील ,पं.स.सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्यासह मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते उपस्थित १o९ सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

                    यावेळी प्रास्ताविक करताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून आजतागायत राष्ट्रवादीचे संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेनेच काम करत आलो आहोत. मात्र आम्ही निष्ठावंत असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणारी माणसं नाही.सध्या मतदारसंघाला लाभलेले आमदार यशवंत माने हे अत्यंत कार्यक्षम आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून लाभले आहेत. जलसिंचनासंदर्भातल्या आश्वासनांचा वापर आजवर आम्ही राजकारणासाठी कधीही केला नाही.आष्टी उपसा सिंचन योजनेत दहा गावांचा समावेश व्हावा यासाठीची बैठक तातडीने यापूर्वीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लावत मतदार संघातील पाणी प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

                    यावेळी आपल्या भाषणातून माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी राजन पाटील यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव करण्याबरोबर लोकनेते अण्णांच्या राजकीय जीवनातील कर्तव्यतत्परतेचा आवर्जून उल्लेख केला. राजन पाटील यांची तालुक्यातील राजकीय पकड मजबूत असल्यामुळेच १९९५ पासून ते जि.म. बँकेवर बिनविरोध संचालक म्हणून निवडून आले. लोकनेते अण्णांनी सहकारी सोसायट्यांना लावलेली शिस्त आजतागायत माजी आमदार राजन पाटील यांनी उल्लेखनीयरित्या कायम ठेवली आहे.याचे विशेष समाधान वाटते असे यावेळी आ.शिंदे म्हणाले. यावेळी सूत्रसंचालन महादेव माने गुरुजी यांनी केले तर आभार लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी व्यक्त केले.

                    मोहोळ तालुक्यातील उर्वरीत जलसिंचन योजनांना भरीव निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राजन पाटील यांनीही आम्हाला काहीही नको आमच्या भागातील जनतेला पाणी द्या अशी मागणी केल्याने वेळोवेळी आम्हाला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सहकार्याची भूमिका ठेवली आहे. ३० एप्रिल रोजी अजितदादा मोहोळ मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी त्वरित याबाबत बैठक लावण्याचा दिलेला शब्द एक जून रोजी बैठक बोलावून पूर्ण केला. या बैठकीत सदरची योजना माझी योजना माझीच आहे अशा भावनेने गतिमानतेने सर्वे पूर्ण करून त्वरीत अहवाल सादर करण्याचा सूचना अजितदादांनी दिल्या होत्या. या योजना पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सातत्याने सुरू राहणार आहेत. - आ.यशवंत माने (मोहोळ विधानसभा)

                    गत महिनाभर माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना जोर आला होता. एक ऑगस्ट रोजी अनगर येथे होणाऱ्या कार्यक्रमात याबाबत राजन पाटील भूमिका स्पष्ट करणार अशी अपेक्षा सर्वांना होती. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक माध्यम प्रतिनिधींनी अनगर येथे धाव घेतली होती. मात्र राजन पाटील यांनी शेलक्या शब्दात आम्ही निष्ठावंत आहोत, मात्र स्वाभिमान गहाण ठेवणारे नाहीत.असे सूचक विधान करत आपल्या भविष्यातील भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला. जेव्हा बळीराम काकांचे भाषण सुरू झाले तेव्हा काका काय बोलणार याची उत्कंठा प्रत्यक्ष शब्दाला उपस्थितांमध्ये जाणवत होती. शेवटी काकांनी आपले शब्दास्त्र बाहेर काढलेच ते म्हणाले " अहो कोणच नाही बोलले तरी मला आता बोलावेच लागेल. यावेळी त्यांनी गटबाजी पेरणाऱ्या पक्ष नेतृत्वाला अप्रत्यक्ष सूचक इशाराच दिला "कोणीही प्रत्येक तालुक्यात येऊन उपटसुंभासारखे गप्पा मारतात आणि अशा फाटक्या लोकांना पक्षश्रेष्ठी ताकद देतात. जर असेच होत राहिले तर तिसरेच काहीतरी घडून पक्ष नेतृत्वाला पश्चातापा शिवाय काहीच हातात उरणार नाही" असे सूचक विधान काकांनी केले. काकांचे हे भाषण म्हणजे पक्ष नेतृत्वाला सल्ला होता की सूचक इशारा होता याबाबतची चर्चा उपस्थित यामध्ये रंगली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages