सर्व साहित्यावर जीएसटी लागू तर कामगारांचे वेतन वाढ का नाही? जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड यांचा सवाल

मोहोळ, (कटुसत्य वृत्त):- जीएसटी च्या नावाखाली शेतकऱ्याने स्वतःच्या विहिरीतलं पाणी जर शेतीसाठी वापरलं तर त्याच्यावर सुद्धा जीएसटी लागू करणाऱ्या केंद्र सरकारला मयताच्या लागणाऱ्या साहित्यावर जीएसटी सोडून सर्वच वस्तूवर जीएसटी जर तुम्ही लावत असाल तर ज्यांच्या घामावर तुमचं उत्पन्न वाढते, त्या शेतमजुरासहीत सर्वच कामगारांचे वेतन वाढवत असताना तुमचा हात का आकडतोय, कामगारांना वेतन देत असताना तुम्हाला लाज वाटत आहे, असा जहरी पण वास्तववादी सवाल पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड यांनी केला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कृष्णाजी गायकवाड पुढे म्हणाले आहेत की, ज्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं, त्या शेतकऱ्याच्या बांधावर मर मर काबाडकष्ट करणाऱ्या शेतमजुराला किमान वेतन ठरवत असताना अजूनही तो प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. शेतकऱ्याच्या कर्जाच्या माफीचा विचार केला जातोय, पण बांधावर कष्ट करणाऱ्या किंवा शेतीतून उत्पन्न ज्याच्या घामावर अवलंबून आहे, त्या शेतमजुराच्या प्रश्नांचा विचार कुणीच करताना दिसत नाही, सत्ता कुठल्याही पक्षाची असो कुणालाही शेतमजुराच्या वेतनाचं काहीही देणे घेणे नसून भविष्यात जर शेतमजुराचे वेतन नाही वाढलं तर पुरोगामी संघर्ष परिषद राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा कृष्णाजी गायकवाड यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment