बिलकिस बानो प्रकरणातील ११ दोषी नराधमांना फासावर चढवा ; सांगोल्यात राष्ट्रवादीच्या रणरागिनींची आक्रमक मागणी

सांगोला (कटूसत्य वृत्त):-स्त्रियांना समानतेची वागणूक केवळ भाषणात आणि पुस्तकात नको तर प्रत्यक्षात हवी गुजरात मधील बिलकिस बानो या महिलेवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ११ नराधमांना तात्काळ फासावर चढवा आणि खऱ्या अर्थाने आमच्या भगिनीला न्याय द्या. अशी आक्रमक भूमिका शनिवार दि २७ रोजी सांगोला तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादीच्या महिला रणरागिनींनी आपल्या मागणीचे लेखी निवेदन निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे यांना दिले.
गुजरात येथील बिलकिस बानो या महिलेवर ११ जणांनी सामूहिक अत्याचार केला होता यामध्ये ३ वर्षीय चिमुकलीसह कुटुंबातील इतर ४ महिलांवर बलात्कार करून एकूण ७ जणांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. भारतीय संस्कृतीला आणि परंपरेला काळीमा फासणारे हे कृत्य करणाऱ्या 11 नराधमांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यामुळे पीडित बिलकिसला न्याय मिळाला असे वाटले होते परंतु स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गुजरात सरकारने या ११ नराधमांची देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी नियमबाह्य सुटका केली. संपूर्ण देशभरातून बिल्कीस बानो प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
सांगोला शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी या प्रकरणातील 11 दोषी नराधमांना तात्काळ गजाआड करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. यासाठी एक महिला राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मु यांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या महिला भगिनिला न्याय मिळवून द्यावा या मागणीचे लेखी निवेदन शनिवारी दिले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सखुबाई वाघमारे, शहराध्यक्षा शुभांगी पाटील, संगीता पाखरे, युवती अध्यक्षा प्राजक्ता पाटील, शकुंतला खडतरे, एड. शशिकला खाडे, जयश्री पाटील, प्रतीक्षा खडतरे, जयश्री सावंत, सोनाली शिंदे, मंगल खाडे, सत्यभामा गडहिरे, सुजाता कांबळे, रंजना हरिहर, रुक्मिणी वायदंडे, संगीता कांबळे, अश्विनी कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment