लक्ष्मीकांत सारडे यांच्या जाण्याने आंबेजवळगे पंचक्रोशी हळहळली..!!

खरंच वरील उक्तीप्रमाणे म्हणा किंवा बोल हे एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्ती, सुप्रसिद्ध व्यक्ती, कारखानदार, उद्योगपती किंवा त्यांच्या घराण्यात जन्म घेतलेली व्यक्ती बद्दलचे नाहीत. तर वरील बोल आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेजवळगे या खेडेगावातील दाजी सारडे या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या लक्ष्मीकांत दाजी सारडे यांच्या बद्दलचे.
कै.लक्ष्मीकांत दाजी सारडे यांचे मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5:45 मिनिटांच्या दरम्यान तीव्र ह्रदयाच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 45 होते. त्यांच्या पश्चात वडील दाजी, आई विजयमाला, पत्नी भारती, दोन मुली श्रावणी व श्रेया, मुलगा सार्थक व भाऊ गणेश सासू सासरे असा मोठा परिवार आहे.
कै.लक्ष्मीकांत सारडे यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या जन्मगावी म्हणजे आंबेजवळगे येथे रात्री अकरा वाजता प्रचंड मोठा जनसमुदाय गोळा झाला होता.
त्यावेळी लक्ष्मीकांत सारडे यांना शिकविलेले शिक्षक शोक व्यक्त करताना म्हणाले, ज्याप्रमाणे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे मुलाचं कर्तुत्व शाळेत दिसत. ते मला लक्ष्मीकांत यांच्यामध्ये शाळेत असतानाच दिसले होते. त्याप्रमाणेच लक्ष्मीकांत यांनी आपले आपल्या गावाचे व आपल्या घराण्याचे नाव उज्वल केले. शाळेत असतानाही लक्ष्मीकांत हा मनमिळाऊ व हुशार विद्यार्थी होता. लक्ष्मीकांत यांच्या आठवणी सांगताना शिक्षकांसह सर्व जनसमुदाय गहिवरून गेला होता. त्यांच्या अकाली जाण्याने आंबेजवळगे या गावचा एक हिरा गेला आहे. त्यामुळेच गावात एक पोकळी निर्माण झाली असल्याची खंत ही या शिक्षकांनी आपल्या शोकसभेतील भाषणावेळी बोलून दाखविले.
लक्ष्मीकांत यांचे वडील दाजी सारडे आपल्या अश्रूंना वाट करून देताना म्हणाले, "हे विधात्या तु हे उलट केलं असून माझ्या श्रावणबाळाला घेऊन गेला आहे. हे योग्य नाही केलं.
लक्ष्मीकांत यांच्या मातोश्री विजयमाला आपल्या अश्रूंना वाट करून देताना बालपणापासूनच्या आठवणी सांगत होत्या. लग्नानंतर ही लक्ष्मीकांत व भारती या दांम्पत्यांनी आम्हांला कधीच अंतर दिलं नाही. माझ्या लक्ष्मी नारायणाचा जोडा का रे तू फोडला असा जाबही त्या निर्सगदात्यास विचारीत होत्या.
सासरे विलासराव इंगळे हे लक्ष्मीकांत सारडे यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, ते कधीही जावयासारखे वागले नाहीत. उलट मैत्रीपूर्ण नाते लक्ष्मीकांत यांनी जपले. सारडे व इंगळे या दोन्ही परिवारावर लक्ष्मीकांत यांचा सारखाच जिव्हाळा होता.
चुलत सासरे कुमार इंगळे यांना लक्ष्मीकांत सारडे यांच्या जाण्याचे दुःख अनावर झाले होते.
कै.लक्ष्मीकांत सारडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी व सारडे - इंगळे पारीवाराचे सांत्वन करण्यासाठी पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक व कर्मचारीवर्ग, अंबेजवळगे पंचक्रोशीतील जनसमुदाय मोठ्या संख्येंनी उपस्थित होता.
कै.लक्ष्मीकांत सारडे हे मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांचे आई-वडील, पत्नी, मुले, भाऊ व नातेवाईकांवर प्रचंड प्रेम होते. ते खूप कुटुंबवत्सल होते.

No comments:
Post a Comment