आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचे उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचे उद्घाटन

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचे उद्घाटन


आदिवासी विभागात शिक्षण आणि स्वास्थ्य विकास होणे गरजेचे - केंद्रीयमंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांचे प्रतिपादन

                   नागपूर (कटुसत्य वृत्त):- आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, स्वास्थ्य आणि आर्थिक विकास होणे गरजचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.ना.श्री. नितीन गडकरी यांनी आरोग्य विद्यापीठाचा दूर्गम भागातील लोकांकरीता प्रारंभ करण्यात आलेल्या आरोग्य  विषयक ’ब्लॉसम’ उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी केले.    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली शासनाचा आदिवासी विकास विभाग व कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ’ब्लॉसम’ प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या  मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प.,  अडीशनल ट्रायबल कमिशनर श्री. रविंद्र ठाकरे, गोंडवाना विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थानचे अध्यक्ष श्री. अरुण ललवाणी, विश्वस्त श्री. सुधीर दिवे, विद्यापीठाचे मा. व्यवस्थापन परिषद सदस्य तथा नागपूर विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी, प्रकल्प समन्वयक डॉ. अजीत सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.

                   याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.ना.श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठातर्फे विविध संस्थांच्या मदतीने ‘ब्लॉसम’ या संशोधन प्रकल्पाचा लाभ दूर्गम भागातील आदीवासी समाजाच्या आरोग्य विषयक समस्यांचे पुर्तीसाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधनासमवेत विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्माण होईल असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. सामाजिक विकासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगार महत्वपूर्ण असून त्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करुन सेवा दिली पाहिजे. दूर्गम भागात कच्चा माल मोठया प्रमाणात उपलब्ध असून त्यावर आधारीत उदयोगांना चालना देणे गरजेचे आहे यासाठी विद्यापीठांनी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु करावेत. ‘ब्लॉसम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून या उपक्रामाच्या माध्यमातून दूर्गम भागातील लोकांना स्वास्थ्य विषयक लाभ होणार आहे. आधुनिक आरोग्य विद्याशाखांबरोबरच योगा, प्राणायम यांचा देखील समावेश करण्यात यावा. सिकलसेल, थॅलेसिमिया, कुपोषण आदी आरोग्य विषयक प्रश्न दूर्गम भागात मोठया प्रमाणात आढळतात. या दृष्टीकोनातून देखील कार्य करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली.

                   ते पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या नॅशनल एज्युकेशन पॉलीसीनुसार कौशल्य आधारीत उपक्रम राबविणे गरजेचे आहे. दूर्गम भागात शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी विविध शासकीय योजनांचा उपयोग करुन तसेच सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने निःशुल्क सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

                   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात  विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, दूर्गम भागातील लोकांसाठी विविध संस्थांच्या सहकार्याने कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, नागपूर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिलोरी आणि शासनाचा आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ‘ब्लॉसम’ हा आरोग्य विषयक पथदर्शी उपक्रम ठरणार आहे. नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली यासारख्या दूर्गम भागात विद्यार्थी स्वयंसेवक आरोग्य विषयक जागृती करणार आहेत. आरोग्य सेवा देतांना होणार विलंब त्यातील अडचणी तसेच विविध आजाराची गंभिता लक्षात घेऊन प्रश्नावली व प्रत्यक्ष कार्य करण्यात येणार आहे. विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. स्थानिक डॉक्टर, तज्ज्ञ व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य ’ब्लॉसम’ उपक्रमासाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

                   गोंडवाना विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले की, विदर्भातील दूर्गम भागात आरोग्य विषयक समस्या मोठया प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य विद्यापीठाचे टीम ’ब्लॉसम’च्या माध्यमातून उपलब्ध झाली असून हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर कौशल्यशिक्षण घेऊन उपजिविका करतील असे उपक्रम राबविण्यात सुरु करण्यात आले आहेत. दूर्गम भागातील लोक विकास प्रक्रियेत सामाविष्ट व्हावेत असा मनोदय विद्यापीठाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

                   आरोग्य विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले की, ब्लॉसम या प्रकल्पाची माहिती दिली. नागपूर विभागीय केंद्राच्या विविध उपक्रमांची  तसेच नव्याने कार्यान्वीत होणाऱ्या आदिवासींचे आरोग्य विषयक अध्यासनांची माहिती दिली. याच बरोबर अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप गोडे यांच्या नावाची त्यांनी घोषणा केली.

                   कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नीत तोरणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थानचे स्वयमसेवक विद्यार्थी व प्रहार अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages