आपुलकी प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद - तुकाराम बाबा महाराज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 23, 2022

आपुलकी प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद - तुकाराम बाबा महाराज

आपुलकी प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद - तुकाराम बाबा महाराज

मोक्षरथाचा  लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

                 सांगोला (कटुसत्य वृत्त):- गाडगेबाबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून चालू असलेले आपुलकी प्रतिष्ठानचे काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत तुकाराम बाबा महाराज यांनी व्यक्त केले.

                 सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून तयार केलेल्या मोक्षरथाचा  लोकार्पण सोहळा सोमवार दि. 22 रोजी कविराज मंगल कार्यालय सांगोला येथे संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे होते.

                 यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, संघटनेला एकीचं बळ लागतं. विविध क्षेत्रातील एका विचाराची माणसं एकत्र येऊन आपुलकी प्रतिष्ठान मध्ये काम करत आहेत. आपुलकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी कामे केली जात आहेत. खरोखरच चांगलं काम आपुलकीमार्फत होत आहे. आपुलकी तळागाळाच्या माणसांपर्यंत पोहोचत असल्याचे पाहून समाधान होत आहे. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. मोक्षरथासारखा समाजोपयोगी उपक्रम राबवून आपुलकीने मोठे काम केलेले आहे.  माणसाने माणसाला मदत करणे गरजेचे असून मनातले वाईट विचार जाऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

                 यावेळी बोलताना मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने आपणास शक्य आहे ते कृतीमधून दाखवले पाहिजे. समाज माध्यमातून नकारात्मक गोष्टीचा जास्त प्रसार केला जातो त्या तुलनेने सकारात्मक गोष्टींचा प्रसार जास्त होत नाही, मात्र आपुलकीच्या कामाचा प्रचार व प्रसार सकारात्मक दृष्टीने होतो. असे सांगून गरजू कुटुंबाला आपुलकी देत असलेली मदत आपणास लांबून छोटी वाटत असली तरी त्या कुटुंबाच्या दृष्टीने ती खूप मोठी असते. आपुलकीमध्ये समाजातील सर्व घटक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून जे सामाजिक कार्य होत आहे, ते खूप चांगले होत आहे. आपुलकीचा समाजसेवेचा यज्ञ असाच चालत राहावा त्यासाठी आमचेही सहकार्य राहील असेही मुख्याधिकारी केंद्रे यांनी यावेळी सांगितले.

                 प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपुलकीच्या कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मोक्ष रथाची पूजा करून लोकार्पण करण्यात आले. संध्या तेली यांनी "माणसाने माणसाशी माणसासम वागणे " ही प्रार्थना आपल्या सुमधुर आवाजात सादर केली. पाहुण्यांचा परिचय अरविंद केदार यांनी करून दिला. त्यानंतर मोक्ष रथाचे कारागीर चंपक व अरविंद मकवाना, रथाचे सारथी लक्ष्मण घनसरवाड यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आपुलकी सदस्य हमीद इनामदार, डॉ. संतोष पिसे, जगताप गुरुजी, ऍड. गजानन भाकरे, अशोक पवार यांनी आपुलकीच्या कार्यविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मनोज उकळे सर यांनी तर आभार प्रदर्शन सचिव संतोष महीमकर यांनी केले. कार्यक्रमाला आपुलकी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 मोक्ष रथ हा आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालविण्यात येणार असून आजपासून हा रथ अंत्ययात्रेसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क (शहर हद्दीसाठी 1000 रुपये) आकारण्यात येणार आहे. ज्यांना रथाची गरज भासेल त्यांनी अरविंद केदार मो. 9270687900 व संतोष महिमकर मो. 7620657112 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आपुलकीच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages