भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 8, 2022

भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम

भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम

यात्रा कालावधीत उपजिल्हा रुग्णालयात 24 वैद्यकीय सेवा

             पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- आषाढी यात्रेमध्ये पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट व दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. तसेच यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकऱ्यांना उपचारासाठी दिवस रात्र (24 तास) उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध  असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम  यांनी दिली.

             आषाढी यात्रेच्या कालावधीत आरोग्याची आवश्यक काळजी घेण्यासाठी वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद तालुका आरोग्य विभाग या सर्वांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी तसेच शहर परिसरातील  ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

             यात्रा कालावधीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ यासारखे विशेषज्ञ उपलब्ध असून या ठिकाणी अद्यावत शस्त्रक्रिया गृह, प्रसूती विभाग कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. तसेच सर्पदंश, विषबाधा, हृदयरोग, पक्षाघात त्याचबरोबर काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्वतंत्र फिरते वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील दर्शन मंडप येथे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सुविधेसह  स्वतंत्र अतिदक्षता विभाग 24 तास कार्यान्वित करण्यात आलेला आहे. याचबरोबर 65 एकर भक्ती सागर येथे टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांच्यामुळे होणारा मुख कर्करोग याबाबत जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. एचआव्ही,एडसृ्बाबत  जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण व प्रतिबंध सोसायटी मुंबई तसेच आयसीटीसी सोलापूर यांच्या माध्यमातून समुपदेशन व रक्तचाचणी केंद्र मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती डॉ.गिराम यांनी दिली.

             तसेच यात्रा कालावधीत विविध रुग्णांकरिता स्वतंत्र कोविड अतिदक्षता विभाग व संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांकरिता 35 खाटांचा  स्वतंत्र विभाग याचबरोबर गंभीर आजारांच्या रुग्णांकरिता पुढील उपचारांसाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे. यात्रा कालावधीत रुग्णालयात रक्त लघवी तपासणी, कोविड चाचणी, एक्स-रे आधी तपासण्या 24 तास उपलब्ध करण्यात आलेले आहेत. आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करुन भाविकांनी यात्रा पार पाडावी. असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages