आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेल्या रान भाज्यांच्या विक्री मधून चालतो आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह...

बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): रानभाज्या अर्थात डोंगर कपारीत, माळरानावर सुरवातीच्या पावसाने पुर्णपणे नैसर्गिक रित्या उगवणार्या पालेभाज्या तसेच फळभाज्यांची ग्रामीण भागातील खवय्यांना ओढ लागलेली असते. सद्या संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील सर्व छोट्या मोठ्या बाजारपेठेत वैविध्यपूर्ण रान भाज्यांचे अक्षरशः प्रदर्शन मांडलेले दिसून येत आहे.
माणगाव तालुक्यातील आदिवासी समाज दिवसभर रानावनात फिरून वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या घेऊन गावागावात आणि छोट्या मोठ्या बाजारपेठेत विक्री साठी आणतात. या रानभाज्या विकत घेण्यासाठी बाजारपेठेत खवय्यांची अक्षरक्षः झुंबड दिसून येते. रान भाज्यांच्या विक्री मधून गरीब आदिवासी समाजाचा दैनंदिन उदरनिर्वाह चालतो. सदर वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या दहा ते वीस रुपये जुडी अर्थात गड्डी या प्रमाणे ग्राहकांना खरेदी करावी लागते.
पावसाळ्याच्या सुरवातीला या रान भाज्यांमध्ये प्रामुख्याने शेवलं,टाकळा,भारंगी,कुरडू, आखूड, तेरी, करटोळी, कुळू, पात्री, आळंबी इत्यादी प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या जंगलात सर्वत्र आढळतात. या रान भाज्यांमध्ये असलेल्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्मामुळे ग्रामीण आणि शहरी खवय्या ग्राहकांमध्ये मोठे आकर्षण असते. त्यामुळे रान भाज्यांना ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे आदिवासी समाजाला या रान भाज्यांच्या विक्री मधून हंगामी रोजगार उपलब्ध होतो. आणि त्या मधून त्यांचा आर्थिक उदरनिर्वाह चालतो.
No comments:
Post a Comment