अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन करणार - नाना पटोले

मुंबई, (नासिकेत पानसरे):- आता राज्यात फक्त दोघांचे सरकार आहे. मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यभर थैमान घातले आहे.उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री आहेत. सरकार अस्तित्वात नाही, प्रशासन ठप्प आहे. रब्बीच्या धान, चना याची खरेदी झाली नाही जी खरेदी झाली त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शेतकरी हंबरडा फोडत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. ही परिस्थिती पाहता काँग्रेस नेत्यांचे पथक अतिवृष्टीग्रस्त भागातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन पाहणी करतील व त्यानंतर नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. ही मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,असे प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील जनतेला तातडीची मदत द्यावी यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रती हेक्टरी ५० हजार रु, व बागायती शेतकऱ्यांना १ लाख रु प्राथमिक मदत तत्काळ देण्याची मागणी केली होती परंतु झालेले नुकसान प्रचंड मोठे असून अजून पंचनामेही झालेले नाहीत त्यामुळे काँग्रेसच्या पाहणी दौऱ्यातील नुकसानीचा आढावा अहवालानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल. कॉग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सर्व माजी मंत्री,राज्यमंत्री,आमदार खासदार जेष्ठ नेते यांच्या सोबत कॉग्रेस पथक असणार अशी माहिती पटोले यांनी दिली.
No comments:
Post a Comment