सोलापूरात ‘लालपरी’चा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एसटी महामंडळाने आज ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. एसटी महामंडळातर्फे यंदा सोलापूर विभागातील सर्व एसटी आगार आणि एसटी बस स्थानकांची सजावट करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापूर विभागातील सोलापूर आगारातही अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यंत्र अभियंता (चालन) विवेक लोंढे तर अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी होते. कार्यक्रमांची सुरूवात दिपप्रज्वलन आणि बसचे पूजन करून तसेच केक कापून करण्यात आली. अन्य कर्मचाऱ्यांनी सोलापूर बस स्थानकावर प्रवाशांचे गुलाबपुष्प आणि पेढे देऊन स्वागत केले. सोलापूर आगार आणि बस स्थानकावर रांगोळी घालून प्रवाशांचे आजच्या दिवशी स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवाशांनी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
एसटीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. या बससोबत प्रवास सुरू झाला आणि १ जून २०२२ रोजी एसटी महामंडळाने ७५ व्या वर्षात पदार्पण केले. एसटीच्या ताफ्यात आता वेगवेगळ्या रंगरुपाच्या बस आहेत. पण पहिली लाल रंगाची एसटी बस आजही राज्यातील नागरिकांच्या आठवणींमध्ये कायम आहे. या बसमुळेच एसटीच्या गाड्यांना ‘लालपरी’ म्हणायला सुरुवात झाली.
एसटीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला जोडले. यामुळे प्रवास करणे सोपे झाले. आजही एसटीचा प्रवास सुखकर प्रवास मानला जातो. कार्यक्रमास विभागीय कार्यालयातील विभागीय अभियंता विरसंघ स्वामी, उपयंत्र अभियंता उत्तम जुंदळे, विभागीय लेखा अधिकारी उदय देशपांडे, विभागीय वाहतूक अधिकारी परशुराम नकाते, उपस्थित होते. प्रास्ताविक सुरक्षा व दक्षता अधिकारी शेखर फरांदे यांनी केले व आभार कामगार अधिकारी प्रदीप सुतार यांनी मानले.
No comments:
Post a Comment