समाज कल्याणच्या विविध योजनांचा आढावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 2, 2022

समाज कल्याणच्या विविध योजनांचा आढावा

समाज कल्याणच्या विविध योजनांचा आढावा

रमाई आवासची अपूर्ण बांधकामे जूनअखेर पूर्ण करा सहायक आयुक्त कैलास आढे यांच्या सूचना

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना राबविण्यात येते. चार ते पाच वर्षांपासून घरकुले मंजूर असून पैसे मिळूनही काही बांधकामे अपूर्ण आहेत. येत्या जूनअखेर कामे पूर्ण करण्याच्या सूचना समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या.

               अपर जिल्हाधिकारी यांच्या कक्षात समाज कल्याण विभागांच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत श्री. आढे बोलत होते. यावेळी नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त एन.के. पाटील, नगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

               आढे यांनी सांगितले की, रमाई आवासमधील घरकुल पूर्ण झालेल्यांचे जीओ टॅगिंग आठ दिवसात करून घ्यावे. दर महिन्याच्या 30 तारखेला घरकुलांचा प्रगती अहवाल पाठवावा. मिळालेला निधी पूर्णता खर्च करावा.

               ग्रामीण भागातील गावांची, वस्त्यांची, रस्त्यांची नावे बदलून नवीन नावे देण्यासाठी 1366 प्रस्ताव आले आहेत. महानगरपालिकेचे 48 तर पंढरपूर, करमाळा नगरपालिकेचे 80 प्रस्तावही आले आहेत. उर्वरित नगरपालिकांनी सर्वसाधारण सभेचे ठराव घेऊन त्वरित प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

               ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक आणि प्राधान्य द्यावे. सहायता कक्षाची स्थापना करावी, शासकीय आणि खाजगी दवाखान्यांनी ज्येष्ठ नागरिकांना खाटा उपलब्ध करून द्याव्यात. नगरपालिकांच्या ठिकाणी विरंगुळा केंद्राची स्थापना करण्याच्या सूचना श्री. आढे यांनी दिल्या. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages