माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत मोहोळ नगरपरिषदेचा राज्यात १९ वा क्रमांक

मोहोळ (कटूसत्य वृत्त) : राज्य शासनाद्वारे १६ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंच तत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान २.० हे शासनाचे महात्वाकांक्षी अभियान राज्यभर अमृत शहरे, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील २२६ नगरपरिषदांच्या गटामध्ये मोहोळ नगरपरिषदेने राज्यात गतवर्षीच्या तुलनेत १२९ वरून १९ वा क्रमांक पटकावला आहे. यामुळे मोहोळ नगरपरिषद प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राज्य शासनाद्वारे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, पर्यावरणाची होत असणारी हानी रोखण्यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरु करण्यात आले. या अभियानात पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांवर आधारित घटकांवर आधारित राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. मोहोळ नगर परिषदेने या स्पर्ध्येमध्ये सहभाग घेतला होता. या अभियानात मोहोळ नगरपरिषदेने गतवर्षीच्या तुलनेत १२९ वरून १९ व क्रमांक पटकावला आहे. या अभियानात मोहोळ नगरपरिषद मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करणे, सायकल रॅली, वसुंधरा दूतांच्या निवडी यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
यासह मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन, स्वताच्या मालकीची रोपवाटिका ची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमधील हवेचे दरमहा हवा परीक्षण, घनकचरा व्यवस्थापन, विहिरींची स्वच्छता, तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. तसेच शहरातील नागरिकांमध्ये पाणीबचत, वीजबचत, अपारंपारिक उर्जा, ई-कचरा विलगीकरण, फटाकेबंदी, व पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे यासारख्या विषयांवर जनजागृती करण्यात आली. माझी वसुंधरा अभियानाची तत्वे दर्शवण्यासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच वृक्ष गणना व हेरीटेज वृक्ष गणनेचे काम पूर्ण झाले आहे.
सदर अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी राजकुमार सपाटे व शहर समन्वयक हर्षवर्धन माने यांनी मोलाचे योगदान दिले.
मोहोळ शहराच्या विकासाबाबत कायापालट करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. यामध्ये स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत रंगरंगोटी कार्यक्रम हातात घेण्यात आल्या. या माध्यमातून स्वच्छ आस्थापना, हॉटेल, शाळा, कॉलेज, कार्यालय, बँका यामध्येही स्वच्छता क्रमांक काढण्यासाठी स्पर्धा घेण्यात आल्या. यशस्वीतांचा योग्य सन्मान करण्यात आला. यास्तव सर्व मोहोळकरांनी स्वच्छता बाबत सहकार्य केल्यानेच माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत मोहोळ नगरपरिषदेचा राज्यात १९ वा क्रमांक पटकावला आहे. याचे श्रेय सर्व मोहोळकर नागरिकांना जाते. - डॉ. योगेश डोके (मुख्याधिकारी, मोहोळ नगरपरिषद)
No comments:
Post a Comment