सत्ता येते, सत्ता जाते, मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही - खा.शरद पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 27, 2022

सत्ता येते, सत्ता जाते, मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही - खा.शरद पवार

सत्ता येते, सत्ता जाते, मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही - खा.शरद पवार

          मुंबई (कटूसत्य वृत्त):- सत्ता येते, सत्ता जाते मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही असा अनुभवाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना दिला.

          शरद पवार यांनी राज्यातील घसरलेल्या राजकीय पातळीबाबत माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली. शरद पवार म्हणाले की, "मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंसोबत माझे जाहीर मतभेद असायचे. त्यावेळी एकमेकांसाठी शब्द वापरण्यात कोणतीही काटकसर आम्ही दोघांनीही केली नाही. परंतु बैठक संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र भेटायचो. औरंगाबादच्या एका सभेतही आम्ही एकमेकांच्या वक्तव्यावर तुटून पडलो होतो. पण नंतर ज्येष्ठ नेते बापूसाहेब काळदाते, अनंतराव भालेराव यांच्यासोबत नंतरची संध्याकाळ जायची. तेव्हा सभेत बोलल्या गेलेल्या गोष्टींचे स्मरणही आम्ही करत नसू. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून राजकारणाची ही संस्कृती महाराष्ट्रात होती. मात्र आता दुर्दैवाने ती हरवत चालली आहे."

          यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांची विधिमंडळातील चर्चा अत्यंत टोकाची असायची. पण ही मंडळी चर्चा संपल्यानंतर पुन्हा एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायची. मात्र अलीकडच्या काळात दुर्दैवाने नाही त्या गोष्टी बघायला मिळत आहेत, अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

          राज्यातील मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. परंतु त्यांचे एकेरी नाव घेऊन त्यांच्याबद्दल वेडेवाकडे बोलणे शोभत नाही. मुख्यमंत्री ही एक संस्था आहे. या संस्थेचा वकूब कायम ठेवण्याची गरज आहे. परंतु ते न ठेवण्याची भूमिका काही लोक घेताना दिसत आहेत, अशी बाब शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिली. दुसऱ्या बाजूने एखादा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही तुमच्या निवासस्थानी करु शकता. मात्र तो कार्यक्रम आम्ही तुमच्याच दारात येऊन करू, हे म्हणणे काही उचित नाही. अशा प्रकारचा विद्वेष, मतभेद वाढू नये यासाठी आपण काळजी घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

          विरोधी पक्षाकडून होणाऱ्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर शरद पवार यांनी मत व्यक्त केले. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात, प्रत्येकजण काही माझ्यासारखे नसते असा टोला शरद पवार यांनी लगावला. 1978-80 च्या वेळी माझं सरकार बरखास्त केलं गेलं. ही बातमी मला मुख्य सचिवांमार्फत रात्री 12.30 वाजता कळली होती. 12.30 वाजता मी तीन-चार मित्रांना बोलवलं आणि घरातलं सामान आम्ही हलवलं. सकाळी सात वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो. त्यानंतर सकाळी दहा वाजता वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध इंग्लंड मॅच पाहायला गेलो आणि मॅचचा आनंद लुटला.

          सत्ता येते, सत्ता जाते, मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही. मात्र काही लोक तरीही अस्वस्थ राहतात. मी पुन्हा येणार असं जाहीररीत्या बोलूनही ते घडू शकले नाही त्यामुळे त्यांचे अस्वस्थ राहणे साहजिक आहे. परंतु, त्यांनाही या परिस्थितीतून काय परिणाम होतात हे लक्षात येईल व राज्यात योग्य वातावरण निर्माण व्हायला त्यांचेही सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages