अनेक महीन्या पासून रखडलेले कोवीड केअर सेंटर त्वरित सुरू करा.. अन्यथा आंदोलन छेडू
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीत संभाव्य धोका लक्षात घेऊन मोहोळ तालुक्यासाठी २०० बेडचे डेडीकेटेड कोविड केअर सेंटर म्हणजे उपचार रुग्णालय मंजूर करून ते त्वरीत सुरु करावे आणि सध्या त्यातून जाणारी कोवीडचे बळी थांबवावे अशी मागणी भाजपाचे गटनेते तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन केली आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाजपाचे गटनेते तथा नगरसेवक सुशीलकुमार क्षीरसागर यांनी मोहोळ येथील आढावा बैठकीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री भरणे यांच्या समवेत मोहोळचे आमदार यशवंत माने हे देखील उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की पंढरपूर येथे १५० बेडचे कोविड रुग्णालय मंजूर आहे. सोलापूर येथे जिल्हा रुग्णालयात करोना बाधित रुग्णांवर उपचार होतात. इतर तालुक्यातही कोविड बाधित रुग्णांवर उपचार होतात मग मोहोळ तालुक्यासाठी असा दुजाभाव का? मोहोळ तालुक्यात जनता कायम आरोग्यकर देते तर मग त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे ऑक्सिजन व इतर योग्य त्या सोयीसुविधा असणारे २०० बेडचे कोविड रुग्णालय कार्यरत होण्यासाठी इतका वेळ प्रशासन का घेत आहे ? असा सूचक सवाल यावेळी क्षीरसागर यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केला आहे.
मोहोळ तब्बल १०४ गावांचा तालुका असून त्याचा विस्तार मोठा आहे. सोलापूर शहरात असणाऱ्या सहकारी रुग्णालयात शहरातील आणि ग्रामीण असा रुग्णांचा मोठा ताण असल्याने तिथे मोहोळच्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. मोहोळ तालुक्यात विलगीकरण कक्ष असून कोविड रुग्णांवर उपचार करणारे सरकारी रुग्णालय नाही. सोलापूर शहरातील रुग्ण संख्या अधिक असल्याने मोहोळच्या रुग्णांना बेड मिळण्यास असंख्य अडचणी येत आहेत. त्यामुळे कोविडबाधित रुग्णांची हेळसांड होत आहे. खाजगी रुग्णालयात गेल्यास लाखो रुपये रुग्णालयांचे बिल भरणे सर्वसामान्य जनतेला शक्य नाही. त्यामुळे अनेक बाधित रुग्ण घरीच बसून जीवाशी खेळ करत उपचार घेत आहे. सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असून मोहोळच्या रुग्णांच्या जीवाशी हा खेळ कुठपर्यंत होत राहणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावा गावात तपासणी वाढवण्यात येऊन वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक गावोगावी लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना प्रशासनाला द्याव्यात. अशी मागणीही त्यांनी पालकमंत्री भरणे यांच्याकडे केली आहे.यावेळी भाजपचे मुजीबभाई मुजावर, तालुका सरचिटणीस सागर लेंगरे, शहर सरचिटणीस विशाल डोंगरे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तसेच क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या मोहोळ तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचार होत नाहीत. तसेच येथे सध्या एकही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही, ही तालुक्याची मोठी शोकांतिका आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांना सोलापूर किंवा इतरत्र उपचारासाठी न्यावे लागत असल्याने नातेवाईकांची मोठी कसरत होत असून त्यामुळे नातेवाईकांना कोरोनाचा धोका वाढत आहे. यावर पर्याय म्हणून मोहोळ तालुक्यासाठी मोहोळ शहरांत २०० बेडचे कोव्हीड सेंटर सुरू करावे अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - सुशील क्षीरसागर (नगरसेवक तथा शहराध्यक्ष मोहोळ भाजप)
0 Comments