महाराष्ट्रासोबत केंद्र सरकारचा दुजाभाव ; निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी केवळ २६८ कोटींची मदत

सोलापूर (क.वृ.):- केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासोबत सातत्याने दुजाभाव सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना आखडता हात घेत केवळ 268.59 कोटी रुपयांची तुटपुंजी मदत महाराष्ट्रासाठी जाहीर केली आहे. त्या तुलनेत नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या अन्य राज्यांना भरघोस मदत करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातील समितीने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी विविध राज्यांना 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र या राज्यांना अम्फान, निसर्ग चक्रीवादळांनी तडाखा दिला, तर कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांना पुराचा सामना करावा लागला होता. सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी गृहमंत्रालयाद्वारे नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फंडांतर्गत ही मदत मंजूर करण्यात आली आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मोठय़ा आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी 1 हजार 65 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती, मात्र केंद्र सरकारने केवळ 268.59 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पश्चिम बंगालला सर्वाधिक मदत
अम्फान वादळाचा सामना करणाऱ्या पश्चिम बंगालला सर्वाधिक 2707.77 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींकडून बंगालला 1 हजार कोटी आणि ओडिशाला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मृतांच्या वारसदारांना दोन लाख रुपये, तसेच जखमींना 5 हजार रुपयांच्या मदतीची घोषणादेखील केली होती.
राज्य निहाय मदत :-
- प. बंगाल 2,707 कोटी 77 लाख
- कर्नाटक 577 कोटी 84 लाख
- मध्य प्रदेश 611 कोटी 61 लाख
- महाराष्ट्र 268 कोटी 59 लाख
- ओडिशा 128 कोटी 23 लाख
- सिक्कीम 87 कोटी 84 लाख
0 Comments