मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांची आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत दि. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी निश्चित करावयाच्या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सायंकाळी 5 वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या दालनात पार पडली.
या बैठकीमध्ये मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध सूचना व अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रांची उपलब्धता, नागरिकांची सोय, प्रवेशयोग्यता तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित बाबींवर राजकीय पक्षांनी मते मांडली. या सूचनांचा विचार करून पुढील टप्प्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले.
तसेच पक्ष प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या इतर मुद्द्यांच्या अनुषंगाने जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणी महापालिकेमध्ये कार्यरत असल्यास त्यांनी प्रचार सभांमध्ये किंवा प्रचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा सहभाग घेऊ नये. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. निवडणुकीदरम्यान एखाद्या व्यक्तीने दोन ठिकाणी मतदान केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच मतदान केंद्रांची माहिती, निवडणूक खर्च, जाहिरातींचे नियम व त्यांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच शहरातील कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता जाहिराती लावू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेबाबत किंवा अन्य कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच ‘माय सोलापूर’ अॅपवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
ही बैठक शांततेत व सकारात्मक वातावरणात पार पडली असून सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे,सह. आयुक्त गिरीष पंडित,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट )ऍड. यु. एन बेरिया,कॉग्रेस पार्टी संजय हेमगड्डी,केशव इंगळे,शिवसेना शिंदे गट अमोल बापू शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजा भाऊ सरवदे,भाजप प्रवीण कांबळे, नागेश गंजी,कॉग्रेस पार्टी देवाभाऊ गायकवाड,mim शौकत पठाण,माकपा अनिल वासम,नरेश दुगणे, दाऊद शेख,आम आदमी पार्टी जुबेर हिरापुरे, निलेश सांगेपाग,अमोल पूदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महेश धाराशिवकर,प्रताप चव्हाण, बसपा शीलवंत काळे,गणेश डोंगरे,राष्ट्रवादी अजितदादा गट वैभव गगणे, शिवसेना शिंदे गट अर्जुन सलगर, मुस्ताक शेख,अब्दुल शेख,जनविकास क्रन्ति सेना गुरनाथ कोळी,श्रीनिवास बोगा,यांच्या सह सर्व राजकीय पक्ष चे उमेदवार उपस्थिती होते.
.png)
0 Comments