सांगोला तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण
सांगोला (प्रतिनिधी) - सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांचे तसेच परदेश, परराज्य आणि पुणे मुंबई व इतर शहरातून सांगोला तालुक्यात दाखल झालेल्या नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण नुकतेच पंचायत समिती मार्फत पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणात तालुक्याच्या ग्रामीण भागातील 57,823 कुटुंबांचा व 3, 05,628 नागरिकांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला. प्रत्येक गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी गावातील व वाडी वस्तीवरील घरोघर जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित केली. प्रत्येक नागरिकाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसतात का, याची सुद्धा पाहणी करण्यात आली. इतर ठिकाणाहून गावात आलेल्या नागरिकांची विशेष चौकशी सर्वेक्षणात करण्यात आली. तसेच त्यांना 14 दिवस घरीच थांबून होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच यापुढे कधीही कोरोना बाबत काही लक्षणे दिसल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय इथे संपर्क करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. सुदैवाने अद्याप सांगोला तालुक्यात एकही कोरोना सदृश्य रुग्ण आढळून आलेला नाही, असे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले.
आता हे सर्वेक्षण ऑनलाईन करण्याचे काम सुरू असून ग्रामपंचायत च्या आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र चालक तसेच काही अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती हे सर्वेक्षण ऑनलाईन करण्याचे काम करत आहेत. सदर काम पुढील तीन चार दिवसात पूर्ण केले जाईल, असेही गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले.
सदर सर्वेक्षण गावपातळीवर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी पार पाडली. तसेच तालुका स्तरावरून 9 विस्तार अधिकारी व 5 अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी नोडल ऑफिसर म्हणून काम पाहिले. त्यांनी दैनंदिन अहवाल संकलन व मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडली. सदर सर्वेक्षणाचे एकंदर सनियंत्रण सहाय्यक गट विकास अधिकारी विकास काळोखे, तालुका आरोग्य अधिकारी सीमा दोडमनी व बाल विकास प्रकल्प अधिकारी असमा आतार यांनी केले.

No comments:
Post a Comment