कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा : डॉ. जितेंद्र आव्हाड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 14, 2020

कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा : डॉ. जितेंद्र आव्हाड

कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा : डॉ. जितेंद्र आव्हाड 

माझ्या सतत संपर्कात असणारी एक व्यक्ती कोरोनाबाधित आहे हे कळल्यानंतर मी स्वतः डॉक्टरी सल्ल्यानुसार क्वारंटीनमधे गेलो. माझी चाचणी निगेटिव्ह आली असली तरी सात दिवसांनी होणाऱ्या दुसऱ्या चाचणीपर्यंत आणि त्यानंतर डॉक्टरांनी अनुमती देईपर्यंत मी घराबाहेर पडणार नाही.
एक साधा विचार मनात आला. आज खाजगी, अत्याधुनिक केंद्रात ज्यासाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागतात ती कोरोनाची चाचणी आपल्या देशात किती लोकांना परवडू शकते? सरकारी केंद्रात तिचा रिझल्ट यायला पाच दिवस लागतात. 60 % बाधितांना सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणं दिसत नसतात हे लक्षात घेता, रिझल्ट येईपर्यंत ती व्यक्ती दगावू शकते.
मी आणि माझ्या पत्नीने एक निर्णय घेतला आणि आमच्या संपर्कातील किंवा ओळखीपाळखीच्या सगळ्यांचीच आपण स्वखर्चाने चाचणी करुया. त्यापैकी 80 लोकांची चाचणी खाजगी ठिकाणी स्वखर्चाने करून घेतली. 80 जणांपैकी 8 जण Positive निष्पन्न झाले. अजून 40 कर्मचा-यांच्या चाचण्याच आम्ही स्वखर्चाने करून दिल्या. त्यामधील 3 जण हे Positive आले. त्यांचा आमच्याशी कधी संपर्क देखील आला नाही. पण, हे करण्याचे कारण एकच होते कि, आमच्या मानवी संवेदना जाग्या आहेत. ह्या देशामध्ये Mass Testing (सार्वत्रिक चाचण्या) होत नसल्यामुळे कदाचित संख्या आपल्याला कळत नाही. पण, आपल्या खिशात असलेला दोन पैशाचा वापर दुस-यासाठी करावा ही मानसिकता नसलेली लोक या सगळ्याच गोष्टींची टिंगल करताना दिसत आहेत. ह्यामधून होणारा सामाजिक द्वेष, ह्यामधून होणारी सामाजिक हेटाळणी याचा अंदाज अजून अनेकांना आलेला नाही. ज्या झोपडपट्टीमध्ये कोरोना लागण झालेलं घर सापडत, त्या झोपडपट्टीमधून त्याला बाहेर काढल जातं. किंबहुना त्याच्या घरादारासकट त्याच्या मुलाबाळासकट त्याला बाहेर फेकल जात हे किती जणांना माहितीये. बातम्यांसाठी किंवा दिवसभर एखादा विषय चघळण्यासाठी ठिक आहे. पण, त्याचे सामाजिक परिणाम, दुष्परिणाम याचा कधी कोणी विचार केला आहे का ?
आज मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी सगळ्या पत्रकारांच्या चाचण्या करुन घेतल्या. त्यामधील किती Negative आणि किती Positive हे सांगण्याची बाब नाहिये. पण, असे सामाजिक जाणीव असलेले नेते समाजामध्ये हे युद्ध पुढे येऊन लढत आहेत. आज मुंब्रा-कळवा मध्ये मी आणि माझी पत्नी मिळून 80 हजार खिचडीचे वाटप करीत होतो. आज आम्ही दोघेही घरी बसलो आहोत. जेव्हा एखादा सेनापती घरी बसतो तेव्हा त्याचे मागचे सैन्य मरगळतं. आज ह्या 80 हजार खिचडी वाटपाच काय होणार ? हे कालपासून हेटाळणी आणि कुचाळक्या करणारे लोक सांगतील का ? त्यांच्यात हिम्मत आहे का तिथे जाऊन लोकांना जेवण वाढायची. प्रत्येक युद्धामध्ये थोड्याश्या अडचणी येतातच. म्हणून त्या युद्धातून आपण पळ काढण ह्याला नेतृत्व म्हणत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. गेले 20-25 दिवस मी स्वत: जनतेमध्ये फिरतोय. होय मला लोक मूर्ख म्हणतात, वेडा म्हणतात पण, मी आहे तसा. मी लोकांची सेवा केली हे मी माझं भाग्य समजतो. कारण, अशी संधी फार कमी वेळा येते. आज जर आपण या लोकांची भूक भागवू शकलो नाही. तर कोरोनापेक्षा एका भयंकर युद्धाला देशाला सामोरे जावे लागेल. आणि ते कदाचित आपण मुद्दामून डोळ्याआड करत आहोत. कोरोनापेक्षा गल्लीबोळामध्ये फिरून लोक अन्नधान्यासाठी किती त्रस्त आहेत याची माहिती घेतली तर त्यामधील पॉझिटीव्ह माहिती आपण सरकारला देऊ शकू आणि सरकारला मार्ग काढण्यासाठी मदत करु शकू.
काल रात्री माझे मा. श्री. धनंजय मुंडे साहेब आणि मा. श्री. अनिल देशमुख साहेब यांच्याशी बोलणे झाले. त्यांना हे सगळ समजल्यावर त्यांनी ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुकच केलं. आणि ते म्हणाले असे Mass Testing आपण सुद्धा सगळ्या मंत्र्यांनी केले पाहिजे आपल्या Entire स्टाफ ची तपासणी करुन घेतली पाहिजे. ही एक सामाजिक जबाबदारी आहे. त्याच्यातून सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. माझा कुठलाही कुक हा पॉझिटीव्ह नसताना अशा बातम्या देण ह्याला काय म्हणायचे. म्हणजे आपल्याला माणूसकिचा स्पर्श नाही हे ह्यामधून दिसतं. कोणाला खात्री करुन घ्यायची असेल तर माझा कुक आताही खाली बसलेला आहे आपण येऊन त्याच्याबरोबर फोटो काढून जा. बातम्या देताना त्या कमीत-कमी Verify केल्या असतील तर बर होईल ना. पण, अशा युद्धांमध्ये मानवी स्पंदन, मानवी स्पर्श, मानवी दृष्टीकोन हे जिवंत ठेवावेच लागतील. अन्यथा आमच्यासारखे नेते जर घरातच बसले आणि संपर्काच्या बाहेरच गेले तर उद्या अराजकता निर्माण झाली तर त्याला Control कोण करणार ?
जर या चाचण्या झाल्या नसत्या तर हा आजार किती पसरला असता याची कल्पनाच न केलेली बरी. मी काही फार मोठा तीर मारला असा माझा दावा नाही. एक सामाजिक जाणीव म्हणून मी हे केलं. मंत्रिमंडळातील माझे सहकारी मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा ठाण्यातील तमाम पत्रकारांच्या चाचण्या करून घेतल्या. जे मी केलं ते उद्या धनंजय मुंडे साहेब सुद्धा करणार आहेत. कारण ही एक चांगलीच गोष्ट आहे. आपल्या माणसांची आपण काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार.
जितेंद्र आव्हाड Quarantine गेले कारण त्यांच्या अमुक नोकरामुळे किंवा तमूक पोलिसामुळे त्यांना संसर्ग झाला असल्या कुचाळक्या करणाऱ्या, टवाळखोर बातम्या चघळणाऱ्या प्रसारमाध्यमांचा मला खरोखर संताप येतो. मुळात, कुणालाही असा दुर्धर आजार होणं ही काय गॉसिप करायची गोष्टी आहे? तुमच्यातल्या मानवी संवेदना पार संपल्या का? की पेपर खपवण्यासाठी यांनी त्या गहाण टाकल्या?
जे मी, एकनाथ शिंदे साहेब करत आहोत ते करायची ताकद असलेला एक प्रचंड मोठा उच्चभ्रू मध्यमवर्ग आणि धनिक वर्ग आपल्या देशात आहे. आपल्या खिशात जर 10 हजार असतील तर 4 हजार रुपयाची टेस्ट एखाद्या गरीबाची करुन घेण्याची दानत जर दाखवली तर हा रोग तर आटोक्यातच येईल. पण, त्याचबरोबर आपल्या घरात जेवायला मिळतेय तर प्रत्येक घराने जर बाजूच्या गरीबाला किंवा समोरच्या झोपडपट्टीत राहणा-या माणसाला दररोज एक डब्बा पाठवला, दोन घर जेवली तरी पुण्य लागेल. ही परिस्थिती किती भयंकर आहे हे ऑफिसमध्ये बसून किंवा Work From Home करुन समजणार नाही. त्यासाठी गल्लीबोळात उतरावं लागेल. मी अभिमानाने सांगतो कि गेले 20 ते 25 दिवस मी गल्लीबोळात फिरतोय. तेव्हा मला माहितीये कि किती स्फोटक वातावरण आज गल्लीबोळामध्ये तयार झाल आहे. आणि मी जरी होम क्वारंटाईन असलो तरी पुढच्या 6-7 दिवसांत मी परत बाहेर पडेन… परत माझ्या जनतेमध्ये जाईन. आणि ह्या युद्धामध्ये एक अग्रेसर सेनापती म्हणून जनतेची सेवा करेन. तुम्हांला जे काय लिहायच ते लिहा. जी काय टिंगल करायची ती करा. तुमच्या टिंगल टवाळीनी आमच्या सारखे नेते थांबत नसतात.
माझ्यासहीत 80 जणांची चाचणी करण्यात आली. त्यामधील 8 जण asymptomatic होते. याचा अर्थ त्यांना कुठलीही लक्षणे दिसत नव्हती. याचा अर्थ जास्त asymptomatic वाढण्याचा प्रकार म्हणजे… मी माझ्या काही डॉक्टर मित्रांशी माझ्या काही microbiologist मित्रांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे म्हणणे असे आहे कि, याचा अर्थ भारतातील लोकांमध्ये एक प्रतिकारशक्ती निर्माण होतेय ज्याला आपण antibodies म्हणतो ती प्रतिकारशक्ती ह्या व्हायरसला शरीरात जाण्यापासून रोखते. हा व्हायरस शरीरात जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे आपले नाक आहे. यामध्ये अभ्यासपूर्ण मी लिहू शकत नाही. कारण मी काय यामधील तज्ञ नाही. पण, अशा asymptomatic पेशंट्सला रुग्ण म्हणून जाहीर करणे हे मला वाटते कि ही कृरता आहे. ते जोपर्यंत पूर्णत: symptomatic होत नाही व त्यांच्यात त्या रोगाची लक्षणे दिसत नाहीत. तोपर्यंत त्यांना रोगी समजता का ? हा माझा प्रश्न आहे. आणि हे मी गेले 25 दिवस फिरल्यानंतर माझे वैयक्तीक मत जाहीर करतो आहे. भारतामध्ये पहिल्यांदा जगात प्रतिकारशक्ती निर्माण होतेय हे दिसतेय आणि त्यामुळेच कमी चाचण्या करुन पण, खूप जास्त लोकांना रोगाची लागण झाली आहे असे काय दिसत नाही. ज्यांना लागण झाली आहे अशा asymptomatic पेशंट्स हजारोंच्या संख्येत असतील. पण, त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती आज या रोगाविरुद्ध रोगाशी दोन हात करताना दिसतेय आणि त्यात भारत देश यशस्वी देखील होईल.
टिप : ज्यांनी आपल्या वॉचमनलाही जेवण दिले नसेल किंवा ह्या अडचणीच्या काळात आपल्या मोलकरणीलाही धान्य दिले नसेल त्यांनी उगाच नको त्या सूचना करुन वेळ वाया घालवू नये.
                                                                                                       
                                                                                                         -डॉ. जितेंद्र आव्हाड
[ जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक वरील पोस्ट ]

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages