टेंभुर्णी व परिसरातील गावातून शेतकऱ्यांचे शेकडो विजपंप चोरीस
टेंभुर्णी : -टेंभुर्णी व परिसरातील गावातून शेतकऱ्यांचे विजपंप चोरणाऱ्या चोरट्यानी अक्षरशः हैदोस घातला असून शेकडो विजपंप चोरीस जाऊन ही पोलिसात याची ना खबर ना दाद अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली असून नाहक आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यातून याबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.टेंभुर्णी व परिसरातील तीस-चाळीस गावे उजनी जलाशय,भीमा नदी,उजनी डावा कॅनॉल,भीमा-सीना जोड कालवा व भीमा-सीना उपसा जलसिंचन योजना यामुळे संपूर्ण गावे ओलिताखाली असल्याने शंभर टक्के बागायत क्षेत्र असलेली गावे आहेत.याठिकाणी विहिरी,बोअर येथे व कॅनॉलवर ठिकठिकाणी विद्युतपंप बसविलेले आहेत.मात्र अलीकडे या बागायत शेतीला विद्युतपंप चोरीमुळे ग्रहण लागले आहे.टेंभुर्णी,शेवरे,हरिनगर,बें बळे,घोटी या परिसरातून मोठया प्रमाणात विद्युतपंप चोरी होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.पोलिसात फिर्याद द्यायला गेल्यास कुणीही दाद देत नाही.खूप हेलपाटे झाल्यास अर्ज ठेवून घेतात.मात्र पुढे कारवाई काहीच होत नाही व चोरटे ही पकडले जात नाहीत.यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी गणेश भारत खुळे,लक्ष्मण दिलीप केचे,निलेश लक्ष्मण भोसले,शहाजी बाळासो केचे,गणेश भाऊसाहेब केचे यांचे कॅनॉलवरील विद्युतपंप एकच दिवशी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या आहेत.यापूर्वी नाना नांगरे व धनाजी नांगरे यांच्या विहीर व बोअर मधील सहा विद्युत पंप,केबल,स्टार्टर असे ८० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेले होते.मात्र हेलपाटे मारून ही टेंभुर्णी पोलिसांनी नांगरे यांची फिर्याद घेतली नाही.तसेच हरिनगर-बेंबळे येथील युवराज निवृत्ती हुंबे,बापू दत्तू हुंबे,अजित आण्णासाहेब पवार,अंकुश रामचंद्र अनपट, संजय चोपडे,महादेव कावळे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांच्या कॅनॉल,विहीर व बोअरमधील विद्युतपंप,केबल हे साहित्य गेल्या आठवड्यात चोरीस गेले आहे.विद्युतपंप चोरीच्या घटनेने शेतकरी हैराण झाले असून घबराट पसरली आहे.यामुळे विद्युतपंप चोरट्यांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment