पदवीधर मतदार नोंदणीसाठी व्यापक कार्यक्रम राबवा आमदार सुभाष देशमुख यांची कुलगुरूंकडे मागणी
सोलापूर- पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातून अल्प प्रमाणात पदवीधरांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे येत्या काळात ऑनलाईन व ऑफलाईनरित्या पदवीधरांची व्यापक प्रमाणात नोंदणी करण्यासाठी कार्यक्रम राबवावी, अशी मागणी माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.मंगळवारी, आमदार देशमुख यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन कुलगुरू डॉ. फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी देशमुख म्हणाले की, यंदा पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातून खूपच कमी प्रमाणात पदवीधरांनी मतदानासाठी आपली नाव नोंदणी केली आहे. वास्तविक यंदा ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रक्रिया असल्याने मोठ्या प्रमाणात पदवीधरांची नोंदणी होणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. यासाठी विद्यापीठाने पदवीधरांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी यादीत नाव नोंदणी करण्याकरिता विद्यापीठाकडून जनजागृती करण्याची मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली. याचबरोबर 2017 पूर्वी पदवी घेतलेल्या सर्व विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांनी वेळेत नाव नोंदणी करून राष्ट्रीय कर्तव्य पार पडण्यासाठी पात्र व्हावे, असे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले.या भेटीमध्ये विद्यापीठाच्या विकासावरही आमदार देशमुख व कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यात चर्चा झाली. विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा आमदार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment