एकजुटीने 'कोरोना विषाणू'ला परतवून लावूया! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2020

एकजुटीने 'कोरोना विषाणू'ला परतवून लावूया!

एकजुटीने 'कोरोना विषाणू'ला परतवून लावूया! आठवडाभरात 1500 बेड असलेले 'विलगीकरण कक्ष' कार्यान्वित होणार
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख


मुंबई:गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पुण्यात 700, मुंबईत 200 आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून 500 असे राज्यभरात एकूण 1 हजार 400 बेड असलेले 'विलगीकरण कक्ष' (आयसोलेशन वॉर्ड) येत्या आठवभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मंत्रालयात 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित उपस्थित होते.
येत्या आठवड्याभरात कार्यान्वित होणाऱ्या विलगीकरण कक्षामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. या रुग्णांचा इतर रुग्णांशी संबंध येऊ नये यासाठी हा स्वतंत्र कक्ष असणार आहे.
कोरोना तपासणीसाठीची लॅब होणार कार्यान्वित
पुण्यातील ससून रुग्णालय, मुंबईतील जे, जे.रुग्णालय आणि हाफकिन येथे येत्या 3 दिवसात कोरोनाबाबतची तपासणी करण्यासाठीची लॅब कार्यान्वित होणार आहे. तर औरंगाबाद, अकोला, धुळे, मिरज, लातूर आणि नागपूर या 6 जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येत्या 15 दिवसात लॅब कार्यान्वित होणार असल्याची माहिती  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.केंद्र शासनाने कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून या सूचनांनुसार सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. व्हेंटिलेटर, वैयक्तिक सुरक्षा करणारे किट, एन-95 मास्क याबाबत आवश्यक त्या सूचना वैद्यकीय अधिष्ठाता यांना देण्यात आल्या असून याबाबत काहीही अडचण असल्यास त्यांनी वैद्यकीय सचिव/संचालक यांच्याशी संपर्क करावा असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
दररोज 4 वाजता मेडिकल बुलेटिन
 देशमुख म्हणाले की, वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दररोज दुपारी 3 वाजेपर्यंत दिवसभरातील कोरोना रुग्णासंबंधातील माहिती वैद्यकीय मंत्री यांचे कार्यालय, वैद्यकीय सचिव आणि वैद्यकीय संचालक यांना सादर करावे. यानंतर दुपारी 4 वाजता माध्यमांना मेडिकल बुलेटिन (वैद्यकीय निवेदन) द्यावे जेणेकरुन माध्यमांना वेळेत माहिती मिळेल शिवाय सर्वसामान्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही.
स्वच्छतेला प्राधान्य द्या
वैद्यकीय रुग्णालय/ महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सध्याची परिस्थिती पाहता रुग्णालय, महाविद्यालय यांची स्वच्छता याला प्राधान्य द्या. तसेच रुग्णालय, महाविद्यालयाची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत अवगत करावे. येणाऱ्या काळात स्वच्छतेबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात यामध्ये नियमित हात धुणे, स्वच्छतेची काळजी याला प्राधान्य देण्यात यावे. रुग्णालयात आणि महाविद्यालयात स्वच्छतेबाबतची संस्कृती रुजविण्यासाठी अधिष्ठाता यांनी विशेष प्रयत्न करावेत असे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केले.
कोरोनाबाबत जनजागृती करा
कोरोना व्हायरस कशामुळे होतो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, कोरोनाची नेमकी लक्षणे कोणती आहेत याबाबत महानगरपालिका/नगरपालिका यांच्या मदतीने जनजागृती मोहिम हाती घ्यावी. महाविद्यालयाच्या आवारात, वर्तमानपत्रात, आर्टवर्कच्या मदतीने, समाजमाध्यमांवरुन याबाबत जनजागृती करण्यासाठी अधिष्ठातांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही  देशमुख यांनी यावेळी केले.
अधिष्ठाता, डॉक्टर, नर्सेस हे संकटमोचक
आताचा काळ हा आपत्तीचा काळ आहे. आताच्या परिस्थितीत रुग्णांची काळजी घेण्यासाठी अहोरात्र काम करीत असलेले डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी जबाबदारीने काम करीत असून त्यांच्या कामाचे करावे तेवढे कौतुक आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांना सुट्टी देण्यात आलेली नाही कारण या विद्यार्थ्यांनी आता या परिस्थितीत काम करुन डॉक्टर, नर्सेस यांना सहकार्य करावे. आताच्या परिस्थितीत आपण सर्वजण आपापल्या जबाबदारीचे भान राखून काम करीत असून महत्वाची भूमिका बजावत असल्याने आपण सर्व जण खऱ्या अर्थाने संकटमोचक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री . देशमुख यांनी सर्व अधिष्ठांताशी संवाद साधताना सांगितले.
‘वॉर अगेंस्ट व्हायरस’ आपण निश्चित जिंकणार

डॉक्टर्स, नर्सेस म्हणजे लढणारे जवानच

जनतेने गर्दी करणे बंद करावे, सूचनांचे पालन करा
पंतप्रधान, केंद्राकडून पुरेसे सहकार्य

‘लाईव्ह प्रसारणात’ मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक धीर
मुंबई, : कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे, त्यामुळे आपण ही साथ अजून तरी नियंत्रणात ठेवली आहे मात्र आणखीही शर्थीचे प्रयत्न केले तर महाराष्ट्र या  संकटावर मात करेल. मी स्वत: आज देखील पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोललो असून त्यांनी राज्याला पुरेपूर सहकार्य केले जाईल हे सांगितले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे सांगितले. जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधांचा साठा करू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
गर्दी पूर्ण बंद करा
मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांनी सरकार ज्या ज्या सुचना देत आहे तेवढ्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. आमच्या आवाहनानंतर सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र तरी देखील आपण गर्दी पूर्ण बंद केली पाहिजे. आपण शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तरीसुद्धा आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा, सूचनांचे आणखी काटेकोर पालन केले पाहिजे.

आपण ज्या उपाययोजना करीत आहोत त्या समाधानकारक असल्या तरी विषाणू एकेक पाउल पुढे टाकत असल्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. यंत्रणेमध्ये काम करणारीही माणसेच आहेत. त्यांच्यावरचा भार वाढेल असं कृत्य आपल्याकडून व्हायला नको.
होम क्वारंटाईन व्यक्तींनी फिरू नये
आज सर्वच रुग्ण बाहेरून लागण झालेले आहेत. बाहेरची लोकं देखील आपलीच आहेत, नातेवाईक आहेत. मात्र त्यांनी इथे येतांना सर्व काळजी घेऊन येणे महत्वाचे आहे. होम क्वारंटाईन करणाऱ्यांच्या हातांवर शिक्के मारले आहेत, त्यांनी देखील आसपास वावरू नये. आपल्या परदेश प्रवासाची माहिती लपवून प्रवास करू नका.
हे विषाणुशी युद्ध
युद्ध हे जिद्दीने लढायचे असते आणि जिंकायचे असते, अनेकांनी 1965 आणि 1971 चे युद्ध पाहिले असावे, अनुभवले असावे. युद्धाचा अनुभव वाईट असतो. युद्धानंतरची परिस्थिती वाईट असते. देशासाठी छातीचा कोट करून आपले जवान लढतात, धारातीर्थी पडतात. कोरोनाशी ज्या पद्धतीने लढतो आहोत त्यावरून मला 1971 चे युद्ध् आठवते. आजचे युद्ध हे विषाणुशी युद्ध आहे. “वॉर अगेंस्ट व्हायरस.” युद्ध सुरु झाले आहे.
आपले जवान म्हणजे आपले डॉक्टर, नर्सेस, बसचे चालक, स्वंयसेवी सामाजिक संस्था यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. आपण त्यांना घरी राहून सहकार्य करू शकत नाही का?
संकट हे काही जात, पात,धर्म पाहून येत नाही. आपण एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट आपलं काहीही वेडवाकडं करू शकत नाही, शकणार नाही. चीनमध्ये या विषाणुचा पहिल्यांदा प्रादुर्भाव आढळला पण आता चीनने  अनेक कडक उपाययोजना केल्यामुळे  यातून ते बाहेर पडत आहेत. आपल्याला ही बाहेर पडायचे आहे. त्याकरिता पुन्हा एकदा सहकार्य करा, आपण नक्की या संकटातून बाहेर पडू असा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.       

अनावश्यक दंतवैद्यकिय सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन

मुंबई : देशात उद्भवलेल्या कोरोना (कोवीड -१९) या विषाणुच्या प्रसारावर आळा बसावा यासाठी दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांनी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवाव्यात. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना भारतीय दंत संघटने (इंडियन डेंटल असोसिएशन) चे अध्यक्ष डॉ. रविंद्र सिंह यांनी दंतवैद्य चिकित्सकांना दिल्या आहेत.
इंडियन डेंटल असोसिएशन (आय डी ए) या दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या संघटनेने सध्या कोरोना वायरस (कोविड-१९) च्या पार्श्वभूमीवर देशात  उद्भवलेल्या विलक्षण परिस्थितीवर चिंता व्यक्त करत या विषाणुचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा 31 मार्च 2020 पर्यंत  स्वेच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.         
संघटनेचे अध्यक्ष डॉ रविंद्र सिंह यानी दंत वैद्य चिकित्सकांनी स्वत:ची पूर्ण काळजी घ्यावी आणि आपत्कालीन सेवा देताना या आजाराच्या प्रसारावर लक्ष ठेवावे असे नमुद केले आहे. संघटनेचे सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी दंतवैद्य चिकित्सकांना सतर्क राहून आपल्याकडे आलेल्या रुग्णांच्या श्वासाच्या आजारांबाबतीत काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आय. डी. ए. संघटना सर्व दंत वैद्य चिकित्सकांना अद्ययावत माहिती देण्यासाठी व त्यांना वेळोवेळी उपयुक्त मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध आहे. संघटना सर्व दंत वैद्य चिकित्सकांना अद्ययावत माहितीबाबत सतर्क करेल, असेही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करुन द्याव्यात
- डॉ नीलम गोऱ्हे
मुंबई,:  राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजक व इतर व्यावसायिकही ह्या संकटाबरोबर लढण्यासाठी सज्ज होऊन आपले योगदान देत आहेत. जीवनावश्यक गोष्टी जरी बंद नाही झाल्या तरीही या आवश्यक वस्तूच्या पुरवठ्यावर नक्कीच परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने पुढील 2 महिन्याच्या जीवनावश्यक वस्तू नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून ह्याच महिन्यात उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद यांनी शासनास दिले.  दोन महिन्यांच्या जीवनावश्यक वस्तू ह्याच महिन्यात उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने  तत्काळ दखल घेतली असून या बाबत आजच आदेश काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages