घर पट्टी पाणी पट्टी हे कर ग्रामपंचायत उत्पनाचे प्रमुख साधन - सरपंच राजवर्धनी
अकलूज ( प्रतिनिधी ) ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो.अशी माहिती संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच राजवर्धनी माने पाटील यांनी दिली. पुढे बोलताना सरपंच माने- पाटील म्हणाल्या नागरीकांना कर का भरावा लागतो? तर गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारकांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे.कर जमा झाला तरच ग्रामपंचायत गावातील अत्यावश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते.आणि कर जर नाहीच भरला तर? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) २०१५यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी ५% व्याजसुद्धा भरावे लागते. तसेच ग्रामपंचायत कराच्या रकमेच्या वसुलीसाठी अशी मालमत्तेची जप्तीसुद्धा करू शकते. आणि अशा कार्यवाहीचा खर्चही वसूल केला जातो.ज्या गावात ग्रामपंचायतच्या करांचा भरणा लोक स्वइच्छेने करतात, ते गाव नक्कीच प्रगतीपथाकडे अग्रेसर असते, हे सांगण्यासाठी कुणाही ज्योतिषाची गरज नाही. कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतात आणि त्यातूनच एका सक्षम गावाची निर्मिती होत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या करांचा भरणा करून आपली ग्रामपंचायत आणि गाव अधिक सक्षम करुया असे सरपंच राजवर्धनी श्रीराज माने-पाटील यांनी सांगितले .
No comments:
Post a Comment