८ जानेवारी २०२० रोजीच्या केंद्रीय कामगार संघटनाच्या सार्वत्रिक संपात सोलापुरातील विडी कामगार सहभगी होणार!
-कॉ. नरसय्या आडम (मास्तर)
सोलापूर:- लाल बावटा विडी कामगार युनियनच्यावतीने विडी उद्योगातील प्रमुख प्रतिनिधींची बैठक सिटू कार्यालय दत्त नगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे प्रास्ताविक युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. एम.एच.शेख यांनी केले. कामगारांच्या एकूण परिस्थितीबाबत व येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर मांडणी केली. त्याचप्रमाणे देशपातळीवर एकत्रित येत केंद्रीय कामगार संघटनानी घेतलेल्या निर्णयाची माहिती उपस्थित कामगार प्रतिनिधीना दिली. यावेळेस युनियनचे उपाध्यक्ष कॉ. शकुंतला पाणीभाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अध्यक्षा कॉ. नरसम्मा यलगेटी, कॉ. सुनंदा बल्ला, कॉ. फातिमा बेग यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना कॉ. आडम मास्तर म्हणाले कि, भाजप प्रणित सरकार केंद्रात सत्तेवर आल्यावर कामगारांच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचे काम करत आहेत. या पूर्वी याच भाजपच्या केंद्र सरकारने धुम्रपान निषेध विधयेक २००३ आणून विडी उद्योगावर निर्बध आणले. परिणामी कामगारांच्या रोजीरोटीत घट झाली. दैनंदिन कामात कारखानदारांनी कपात केली. विडी कामगारांचे किमान वेतन हे कागदावरच राहिले. एकाही विडी कारखान्यात किमान वेतन कायद्याची अमलबजावणी होत नाही. वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळविलेले कामगार कायद्यामध्ये मोदी सरकार बदल करून मालक धार्जिने धोरण घेत आहेत. विडी कामगारांच्या अशिक्षितपणामुळे भविष्य निर्वाह निधी (प्रा.फंड) मध्ये झालेल्या चुकीच्या नोंदीची दुरुस्ती होत नसल्याने हक्काच्या पेन्शनपासूनहि विडी कामगारांना वंचित राहावे लागत आहे. विडी कारखान्यामध्ये विडी कामगारांच्या परिस्थितीचा फायदा घेत गुल्ला कट्टा, छाटविड्या, वजन मापातील चोरी करून कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे. केंद्र शासनाच्या नोट बंदीमुळे आज आठवड्याला मिळणारी मजुरी महिन्यावर गेली काम सोडून बँकेत हेलपाटे घालावे लागत आहेत. विडी कामगारांच्या कल्याणाकरिता असलेला निधी इतरत्र वळविला जात आहे. त्याचा वापर विडी कामगारांकरिता होत नाही. या व इतर आशा अनेक बाबी विडी कामगारांच्या शोषणाला जबाबदार असून या अन्याय विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ८ जानेवारी २०२० च्या केंद्रीय कामगार संघटनाच्या संपात विडी कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिटूचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.
आडम मास्तर यांनी केलेल्या आवाहनास उपस्थित विडी कामगार प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत विडी उद्योगात ८ जानेवारी चा संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस विडी कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठक यशस्वी करण्यासाठी कॉ. विल्यम ससाणे, बापू साबळे, श्रीनिवास गड्डम, रजाक दंडू, प्रकाश कुऱ्हाडकर, सनातन म्हेत्रे, वासिम मुल्ला, अप्पाशा चांगले, श्रीनिवास तंगडगी, अनिल घोडके, अंबादास बिंगी आदींनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment