सांगोला._- विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे 26 नोव्हेंबर, संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज माढा येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुशील कुमार शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे वाचन करून करण्यात आली. याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना प्रा. शिंदे म्हणाले, आपले संविधान हे लोककल्याणकारी व्यवस्थेशी बांधील असलेले संविधान आहे. जनता ही सार्वभौम असून सार्वजनिक पातळीवर धर्म त्याज्य मानला आहे. व्यक्तीला धर्म असू शकतो पण राज्याला कुठलाही धर्म नाही. भारतीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय राज्यघटना कटिबद्ध आहे. आज देशभरात संविधानाची मोडतोड चालू आहे. घटनात्मक नैतिकता हे सर्वोच्च मूल्य असून त्याचे पालन केल्यास देश समस्यामुक्त होईल. असे विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच दीपाली खांडेकर या विद्यार्थीनीने वास्तविक राजकारणाच्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी उपप्राचार्य प्रा. संभाजी शिंदे, प्रा. काकासाहेब घाडगे, प्रा. तानाजी फुलारी, प्रा. किसन माने, प्रा. किसन पवार, धनाजी गायकवाड, विलास खुळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक वाकडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संताजी गावकरे यांनी केले तर आभार प्रा. धैर्यशील भंडारे यांनी मानले.

No comments:
Post a Comment