पन्हाळगड-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम फत्ते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 24, 2016

पन्हाळगड-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम फत्ते

दीडशेहून अधिक सोलापूरकरांचा सहभाग ; शिवशक्तीसोबतच अनुभवली निसर्गशक्ती 


सोलापूर (विशेषप्रतिनिधी)ः- न थांबणारा पाऊस.. दाट धुके.. झोंबणारा वारा.. छोटे-मोठे ओढे.. झाडा-झुडपातून निघणारा मार्ग.. ठिकठिकाणी असणार्‍या चिखलाचा अडथळा पार करत जय भवानी..जय शिवाजी.., नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय..’चा अखंड जयघोष करीत शिवराष्ट्र हायकर्स व हिंदवी परिवाराच्या मावळ्यांनी पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम यशस्वीरीत्या फत्ते केली. दीडशेहून अधिक सोलापूरकरांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून शिवशक्तीसोबतच अनुभवली निसर्गशक्ती अनुभवली.
शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारा हिंदवी परिवार आणि कोल्हापूरचे दुर्गप्रेमी प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्‍या शिवराष्ट्र हायकर्स या दोन्ही संस्थांच्यावतीने आयोजित केलेली पन्हाळगड ते पावनखिंड ही पावसाळी पदभ्रमंती मोहीम दिनांक ९, १० आणि ११ जुलै २०१६ रोजी संपन्न झाली. या मोहिमेमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून सातशेहून शिवभक्तांनी सहभाग नोंदवला. सोलापुरातल्या शिवभक्तांची संख्या दीडशेच्या वर होती. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
पावनखिंड येथे स्मृतीस्थळाचे पूजन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता विभागाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. मोहिमेचे उद्घाटन पन्हाळगड येथे आमदार बच्चू कडू (अमरावती) यांच्या हस्ते व कॉंग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे (मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी शिवराष्ट्र हायकर्सतर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, ओमप्रकाश शेटे, पत्रकार मंगेश चिवटे यांना आमदार बच्चू कडू यांचे हस्ते शिवराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
पदभ्रमंती मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप, मोहीम मार्गावरील जनावरांची मोफत वैद्यकीय तपासणी, गरजूंना कपड्यांचे वाटप, बियांचे रोपण करण्यात आले.
तीन दिवसाच्या मोहिमेत खोतवाडी आणि पांढरपाणी येथे मोहीमवीरांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत मोहिवीरांना पहिल्यांदाच अतिवृष्टीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे मोहिमेत शिवभक्तांनी थरारक पाऊस अनुभवला. मोहिमेमधील तीन टप्प्यात डॉ. शिवरत्न शेटे यांचे पावनखिंड रणसंग्राम या विषयावर व्याख्यान झाले.
मोहिमेत सोलापूरचे अमोल मोहिते, अरविंद म्हेत्रे, शरणप्पा फुलारी, सचिन पांढरे, काशिनाथ भतगुणकी, अमृत काटकर, महेंद्र राजे, डॉ. रेशमा मेहता, डॉ. अरुंधती हराळकर, परशुराम कोकणे, भाऊराव भोसले, कृष्णा जाधव आदी सहभागी झाले होते.
हिंदवी परिवार आणि शिवराष्ट्र हायकर्सची पुढची मोहीम २७, २८ आणि २९ जानेवारी २०१७ रोजी राजमाची, लोहगड आणि विसापूर येथे होणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages