गुणवत्तापूर्ण शिक्षण असावे अशी राज्य शासनाची भूमिका असून, दहावीमध्ये टक्केवारी जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसारच प्रवेशास प्राधान्य देण्यात येत आहे. सर्व क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या स्थानिक क्षेत्राबाहेर जाऊन प्रवेश घ्यावा लागत आहे. मुंबईत आजपर्यंत १ लाख १३ हजार १६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच अर्ज भरण्याची सोय केली असून, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल याची माहितीही त्यांना देण्यात येत आहे. ७० हजार विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नसून त्यांना प्रवेशासाठी पुढील सात दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासंदर्भांतील माहिती प्रवेश केंद्रावर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास शिक्षण शुल्क माफीची सवलत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पहिलीपासून प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना ब्रेललिपीची पुस्तके देण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणक्रमात इतिहास शिकवताना समाजावर परिणाम करणारे जे धोरणात्मक निर्णय झाले आहेत अशा विषयांचा समावेश करून सर्वसमावेशक पाठ्यक्रम इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असावा का, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. शिक्षकांची भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहे. उच्च तंत्रशिक्षण अंतर्गत येणार्या महाविद्यालयांना एकच सामायिक शाखा देता येईल का, याबाबत विचार करण्यात येणार आहे. तसेच, सर्व तांत्रिक महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांतर्गत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावेळी सदस्य दिलीप वळसे-पाटील, सुनील प्रभू, जीतेंद्र आव्हाड, अजित पवार, प्रा. देवयानी फरांदे, अमिन पटेल, अजय चौधरी या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
No comments:
Post a Comment