सिंहगड पब्लिक स्कूलच्या नेत्रा मगरची सॉफ्ट टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथील विद्यार्थिनी नेत्रा मगर हिने सॉफ्ट टेनिस क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या यशाच्या जोरावर तिची मलकापूर (जि. बुलढाणा) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नेत्राने जिद्द, मेहनत, सातत्य आणि उत्कृष्ट खेळकौशल्याच्या बळावर हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नेत्राच्या या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट्स, केगावचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी तिचे अभिनंदन केले. खेळात यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द, मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास नेत्राने आपल्या कामगिरीतून सिद्ध केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने अशीच उत्कृष्ट कामगिरी करून शाळेसह संस्थेचा आणि सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक उंचवावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी शाळेकडून नेहमीच प्रोत्साहन आणि योग्य संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नेत्राचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
नेत्राला शाळेचे क्रीडाशिक्षक राजू ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याच्या शाळेच्या परंपरेत नेत्राच्या या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:
Post a Comment