शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणंद रस्ते पोहोचवा व रस्त्यांची कामे दर्जेदार करा- आ. नारायण पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 16, 2026

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणंद रस्ते पोहोचवा व रस्त्यांची कामे दर्जेदार करा- आ. नारायण पाटील

 शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणंद रस्ते पोहोचवा व रस्त्यांची कामे दर्जेदार करा- आ. नारायण पाटील


करमाळा, (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेची करमाळा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची आढावा बैठक (दि.१३ नोव्हें) तहसील कार्यालय, करमाळा येथे आमदार नारायण(आबा) गोविंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत करमाळा तालुक्यातील शेत/पाणंद रस्त्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केवळ कार्यालयीन आढावा न घेता प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाणंद रस्त्यांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता पोहोचला पाहिजे या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाणंद रस्त्यांची कामे करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच रस्त्यांची कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दर्जेदार आणि टिकाऊ झाली पाहिजेत अशा स्पष्ट सूचना आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचे असून शेतमालाची वाहतूक, शेती अवजारे आणि इतर सुविधांसाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामात अडथळे येऊ नयेत यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.  यावेळी उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी जयश्री  आव्हाड, सहअध्यक्ष दिग्विजय बागल, तहसीलदार करमाळा, गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा, उपअधीक्षक भूमिअभिलेख, तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, पोलीस निरीक्षक करमाळा यांच्यासह समिती सदस्य नितीनराजे भोसले यांच्या प्रतिनिधी योगिनीराजे राजेभोसले (वहिनीसाहेब), महेंद्र  पाटील, बाबुराव  नटके, तात्यासाहेब गोडगे, भागवत मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बारमाही वाहतुकीसाठी सक्षम आणि दर्जेदार पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages