टेंभुर्णीला स्वतंत्र अग्निशमन गाडी मिळणार? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 16, 2026

टेंभुर्णीला स्वतंत्र अग्निशमन गाडी मिळणार?

 टेंभुर्णीला स्वतंत्र अग्निशमन गाडी मिळणार?

 ग्रामपंचायत सदस्यांचे पालकमंत्र्यांना साकडे

 टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी शहरासह परिसरात गेल्या सहा महिन्यांत आगीच्या चार मोठ्या दुर्घटना घडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, टेंभुर्णी शहरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र आणि सुसज्ज अग्निशमन गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रश्नाकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे लक्ष वेधत टेंभुर्णीतील ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

टेंभुर्णी हे शहर दिवसेंदिवस विस्तारत असून, येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी), मोठी व्यापारी बाजारपेठ, असंख्य दुकाने आणि पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने अग्निसुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असणे अत्यावश्यक बनले आहे. मात्र, शहरात सध्या स्वतःची अग्निशमन गाडी उपलब्ध नसल्याने आगीची घटना घडल्यास कुर्डुवाडी, इंदापूर किंवा माळीनगर येथून अग्निशमन गाडी मागवावी लागते.
परिसरातील अंतर आणि घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता अग्निशमन गाडीला तब्बल ४५ मिनिटे ते एक तास लागतो. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केलेले असते. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. आगीच्या दुर्घटनेत सुरुवातीची काही मिनिटे निर्णायक ठरतात. अशा परिस्थितीत वेळेवर अग्निशमन यंत्रणा उपलब्ध न झाल्यास नुकसान टाळणे कठीण होते.ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई गुरुलिंग पाटील, आरती लखन पवार, नागनाथ वाघे, बाळासाहेब ढगे, कैलास सातपुते आणि ऋषिकेश बोबडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. टेंभुर्णी शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, व्यापारी उलाढाल आणि महामार्गावरील अपघातांची शक्यता याबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत स्वतंत्र अग्निशमन केंद्र व अग्निशमन गाडीची आवश्यकता अधोरेखित केली.
या मागणीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने बैठक आयोजित करून या प्रश्नावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे टेंभुर्णीकरांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अग्निशमन केंद्राच्या मागणीला आता चालना मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
टेंभुर्णी शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार आणि औद्योगिक व व्यापारी क्षेत्राचे महत्त्व पाहता अग्निशमन केंद्र ही केवळ सुविधेची मागणी नसून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी आवश्यक बाब आहे. त्यामुळे शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर स्वतंत्र अग्निशमन केंद्र आणि सुसज्ज अग्निशमन गाडी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली आहे.या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई गुरुलिंग पाटील, आरती लखन पवार, नागनाथ वाघे, बाळासाहेब ढगे, कैलास सातपुते आणि ऋषिकेश बोबडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages