पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर धडक मोर्चा यशस्वी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील अकृषि विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी युनियनच्या वतीने आज पुणे येथे उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर धडक मोर्चा व एकदिवसीय धरणे आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले.
या मोर्चामध्ये शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी मोर्चाला आश्वासित केले की दीपावलीनंतर शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व वित्त विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या समवेत संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन सदर सर्व विषय मार्गी लावण्यात येतील. मागण्या मान्य न झाल्यास १३ नोव्हेंबर रोजी लेखणी बंद आणि १८ नोव्हेंबर रोजी लाक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राज्याचे विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अजय देशमुख, माधव राऊळ व रावसाहेब त्रिभुवन यांनी केले.
प्रमुख मागण्या :
१) १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना लागू करणे
२) सेवानिवृत्तीचे वय ६० करावे
३) जुनी पेन्शन योजना लागू करणे
सोलापूर जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
या मोर्चासाठी सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल थोरात व महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, रवि हुक्कीरे, गजानन काशिद व मलिक रोकडे यांच्या नेतृत्वाखाली 62, सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, सिनेट सदस्य सिद्धेश्वर स्वामी, चिदानंद स्वामी, राजेंद्र नरुणे यांचे नेतृत्वाखाली 25 व अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सोलापूरचे संघटक सचिव राजाराम माने व भीमा मस्के यांच्या नेतृत्वाखाली 25 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment