नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला नवी दिशा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान, आर्थिक व्यवहारांची समज आणि उद्योजकतेचे धडे मिळावेत, या उद्देशाने सोलापूर शहरातील शैक्षणिक वर्तुळात वेगळा ठसा उमटवलेल्या नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘फन फेअर २०२६’ अर्थात आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवाळीच्या उत्साहाला आनंदाची जोड देणाऱ्या या उपक्रमात इयत्ता तिसरी ते नववीतील विद्यार्थ्यांनी ५० हून अधिक स्टॉल उभारून आपल्या कल्पकतेचे, नियोजनकौशल्याचे आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले.
या दोन दिवसीय आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. कुमारदादा करजगी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सचिवा सौ.वर्षा विभुते, व्यवस्थापक श्री.अक्षय चिडगुंपी, संस्थेच्या विश्वस्त सौ. लक्ष्मी करजगी, श्रीमती वनिता करजगी, कु.नंदिनी करजगी, कु.मोहिनी करजगी, श्री यशराज करजगी, शाळेच्या मार्गदर्शिका सौ. मीना पारखे, मुख्याध्यापिका डॉ. सौ.रश्मी कुंभार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.स्मिता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीचा शुभारंभ आनंदोत्सवात व्हावा आणि विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, या हेतूने या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध चविष्ट आणि रुचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. आकर्षक मांडणी, वैविध्यपूर्ण पदार्थ आणि ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विशेष सवलती व ऑफर्स यांमुळे या स्टॉल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे संपूर्ण शालेय परिसराला जणू खाऊ गल्लीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी केवळ खाद्यपदार्थांची विक्रीच केली नाही, तर वस्तूंची मांडणी, ग्राहकांशी संवाद, व्यवहारांचे नियोजन आणि विक्रीकौशल्य यांचाही प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास, स्वावलंबन, संघभावना, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकीय वृत्ती विकसित होण्यास मदत होते. शालेय जीवनात मिळालेला हा अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.कुमारदादा करजगी यांनी व्यक्त केला.
या आनंद मेळाव्यात पालकांनी आपल्या पाल्यांसमवेत विविध मनोरंजक खेळांचा मनमुराद आनंद लुटला, तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन, सुयोग्य व्यवस्था, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांनी उभारलेल्या स्टॉल्सची आकर्षक मांडणी यांचे पालकांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि शिक्षणाला अनुभवाची जोड देणारा हा उपक्रम सर्वांसाठी आनंददायी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन लता भोसले यांनी केले. हा आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment