खाऊच्या पैशांतून चिमुकल्यांनी जपली माणुसकी!
नकाते हिच्या उपचारासाठी ३८ हजार १२५ रुपयांची मदत
अनगर, (कटूसत्य वृत्त):- एखाद्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी वयाची किंवा आर्थिक परिस्थितीची मर्यादा नसते, याचा प्रत्यय अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिला. स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊसाठी जमा केलेल्या पैशांतून तब्बल ३८ हजार १२५ रुपये जमा करून ब्रेन ट्यूमर या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या स्वराली सिद्धेश्वर नकाते हिच्या उपचारासाठी मदत केली.
अनगर येथील स्वराली नकाते ही मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना तिला ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले. सध्या पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे. ही बाब समजताच अनगर परिसरातून मदतीचे हात पुढे येत आहेत.
याच सामाजिक जाणिवेतून पाटील विद्यालयातील स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. स्वतःच्या खाऊसाठी खर्च होणाऱ्या पैशांतून या विद्यार्थ्यांनी नकाते हिच्या उपचारासाठी निधी जमा केला. एकत्रितपणे ३८ हजार १२५ रुपये जमा करून ही मदत तिचे बंधू मल्लिकार्जुन सिद्धेश्वर नकाते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले, प्राचार्य महादेव चोपडे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, शिवाजी थिटे, स्काऊट-गाईड शिक्षक विलास गुंड, सोमनाथ गुंड, रमेश चव्हाण, चंद्रकांत सरक, सत्यवान दाढे, सोमनाथ ढोले, डॉ. प्रशांत कुलकर्णी झाकीर मुलाणी, अंकुश शिंदे, विठ्ठल गुंड शहाजी थिटे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्काऊट-गाईडच्या अनुराधा गोडसे व अनिता लांडगे चंद्रकला उघडे यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
स्वतःच्या खाऊचा आनंद बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चिमुकल्या हातांनी केलेली ही मदत केवळ आर्थिक नसून माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.

No comments:
Post a Comment