भारत-केनिया वस्त्रोद्योग व्यापाराला गती देण्यावर भर- अमितकुमार जैन
नैरोबी (कटूसत्य वृत्त):- 'पॅडिलक्सील' च्या प्रशासन समितीचे सदस्य अमितकुमार जैन यांनी नुकताच केनियाचा महत्त्वपूर्ण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केनियातील भारतीय उच्चायोगाला भेट दिली आणि उच्चायोगातील वाणिज्य विभागाचे द्वितीय सचिव अमरदीप जी. बरनवाल यांची औपचारिक भेट घेतली.
या बैठकीत दोन्ही देशांमधील विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रातील भारत ते केनिया निर्यात कशी वाढवता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली.
प्रमुख मुद्दे आणि बैठकीतील महत्त्वपूर्ण निष्कर्ष:
वस्त्रोद्योग निर्यातीतील संधी: सध्या भारत आणि केनियादरम्यान एकूण ४.१४ बिलियन यूएस डॉलर्स चा व्यापार होतो. मात्र, या एकूण व्यापारात भारतीय वस्त्रोद्योगाचा वाटा सध्या केवळ ६% च्या आसपास आहे.
केनियामध्ये भारतीय वस्त्रोद्योगाच्या निर्यातीसाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे.नियमित संवाद आणि गरजांची समज: अमित कुमार जैन यांनी
केनियातील विविध व्यापारी संघटनांसोबत नियमित संवाद साधण्यावर भर दिला,जेणेकरून केनियाच्या स्थानिक बाजारपेठेच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार पुरवठा करता येईल.
बायर्स-सेलर्स मीट : भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या 'रिव्हर्स बायर-सेलर मीट्स'मध्ये केनियातील अधिकाधिक खरेदीदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला. मुक्त व्यापार करार आणि जकात भारत आणि केनियादरम्यान सुरू असलेल्या 'मुक्त व्यापार कराराच्या' वाटाघाटी लवकरात लवकर पूर्ण होणे भारतीय निर्यातदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, असे जैन यांनी स्पष्ट केले.
एफटीए मुळे चीन आणि इतर प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारतीय वस्त्रोद्योग निर्यातदारांना मोठे प्राधान्य व स्पर्धात्मक फायदा मिळेल.स्थानिक भारतीय समुदायाचे सहकार्य व आक्रमक विपणन: केनियातील बहुतांश व्यापार केनियन-इंडियन समुदायाशी संबंधित असल्याने बाजारपेठेत प्रवेश मिळवणे सोपे आहे. मात्र, जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आक्रमक मार्केटिंग करण्याची गरज असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
----------------- चौकट ----------------
पुढील वाटचाल:
या बैठकीच्या शेवटी, भारत आणि केनियादरम्यान होणाऱ्या सर्व व्यापार व व्यवसायविषयक घडामोडींची माहिती नियमितपणे शेअर करण्यासाठी आणि भारतीय व्यापाऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी भारतीय उच्चायोग आणि पॅडिलक्सील सतत एकमेकांच्या संपर्कात राहतील, यावर एकमत झाले.

No comments:
Post a Comment