बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार; २ व ३ नोव्हेंबरला ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव’
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आवारात २ व ३ नोव्हेंबर रोजी ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील २५ स्वयंसहायता समूह सहभागी होणार असून, त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.
महोत्सव दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्यासह विविध समित्यांचे सभापती उपस्थित राहणार आहेत.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूह विविध दर्जेदार उत्पादने तयार करतात. दिवाळीच्या काळात या उत्पादनांना मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी आणि आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागावा, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात सुकामेवा, दिवाळी फराळाचे पदार्थ, हस्तकला साहित्य, पणत्या, आकाशकंदील आणि दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूंची विक्री केली जाणार आहे. फटाके वगळता दिवाळीशी संबंधित विविध साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांना खरेदीची चांगली संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी नागरिकांना या महोत्सवाला भेट देऊन बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी खरेदीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या मेहनतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनीही केले.
#महिलांच्या उत्पादनांना द्या प्रोत्साहन!
“रुक्मिणी दिवाळी महोत्सवात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, फराळाचे पदार्थ, आकाशकंदील, पणत्या आणि इतर दिवाळी साहित्याची खरेदी करून महिलांना आर्थिक पाठबळ द्यावे.”
— चंद्रशेखर जगताप, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर
उपस्थिती : यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, अनिता माने, शीतल म्हता आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment