किशोरवयीन मुलींसाठी पिंक रूम
कल्याणशेट्टी विद्यालयाची योजना कौतुकास्पद- डॉ सुचित्रा महिंद्रकर
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- मुलींना प्रशालेत शिक्षण घेत असताना आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यावेळी त्यांना हक्काची आणि सुरक्षित जागा मिळाली पाहिजे म्हणून कल्याणशेट्टी प्रशालेमध्ये पिंक रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. ही त्यांची तत्परता कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सुचित्रा महिंद्रकर यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी प्रशालेतील पिंक रूमचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी होत्या यावेळी डॉ सतीश बिराजदार, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, पुनम कोकळगी, रूपाली शहा, आधिपरिचारिका शितल जाधव, उज्वला फडतरे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
डॉ सतीश बिराजदार म्हणाले की, मासिक पाळी हा प्रत्येक मुलीच्या जीवनातील नैसर्गिक भाग आहे, परंतु या काळात आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या अभावामुळे अनेकदा त्यांना नको त्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. म्हणून प्रशालेत पिंक रूम असणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक MHM विभाग प्रमुख मनिषा सुरवसे यांनी केले, सूत्रसंचलन निशिगंधा सोमेश्वर यांनी केले तर आभार कल्पना स्वामी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूजा कडगावकर, विद्या बिराजदार,आरती थोरात यांनी प्रयत्न केले.
चौकटीतील मजकूर
मुलींसाठी पिंकरूम मध्ये सुविधा
'पिंकरूम' च्या आत किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड्स, अचानक अशक्तपणा किंवा पोटदुखी जाणवल्यास विश्रांतीसाठी आरामदायी बेड, तसेच प्रथमोपचार पेटी, शुद्ध पिण्याचे पाणी ठेवण्यात आले आहे अशी माहिती मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी दिली.
पिंकरूम मुळे आत्मविश्वास वाढतो
किशोरवयीन मुली मासिक पाळीच्या काळात शाळा किंवा महाविद्यालयात जाणे टाळतात. काही मुलींचे शिक्षण यामुळे खंडित होते. मात्र, शैक्षणिक संस्थांमध्ये पिंक रूम उपलब्ध असल्यास मुलींचा आत्मविश्वास वाढतो. असे प्रतिपादन शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी केले.

No comments:
Post a Comment