आरोग्य विभागाकडून राबविलेल्या विशेष मोहिमा विद्यार्थ्यांसाठी हितावह- रुक्मिणी धनी
माढा (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील गोरगरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणताही आजार,रोग व विकारांचा त्रास होऊ नये यासाठी शासन व जिल्हा आरोग्य विभागाकडून वेळोवेळी विविध प्रकारच्या रोग प्रतिबंधात्मक मोहीमा राबविल्या जातात.त्यामध्ये धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण,जंतनाशक गोळ्यांची मोहिम,सर्वरोग निदान व उपचार मोहिम, विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार अशा विविध प्रकारच्या उपयुक्त मोहीमांचा समावेश आहे.त्यास विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद घ्यावा जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील तज्ञ मार्गदर्शिका रुक्मिणी धनी यांनी केले आहे.
त्या आनंदनगर-मानेगाव ता.माढा येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश खेंदाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचा डोस देताना बोलत होत्या.
पुढे रुक्मिणी धनी यांनी सांगितले की,आजच्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकांच्या आहारात फास्ट व जंक फूडसह हॉटेल व बेकरी मधील पदार्थांचे प्रमाण वाढले आहे ही बाब निश्चितच गंभीर व चिंताजनक आहे. अनेक विद्यार्थ्यांचे संतुलित, पौष्टिक व सकस आहाराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण व रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याचे जाणवते.काही प्रसंगी वातावरणात किरकोळ जरी बदल झाला तरी असे विद्यार्थी आजारी पडतात आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.विशेषत: मुलांच्या तुलनेत मुलींच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्यांनी दररोजच्या आहारामध्ये शेंगदाणे,गुळ,गाजर,राजगिरा लाडू,चिक्की,ड्रायफ्रूट्स,दुध, ताजी फळे व पालेभाज्या आदींचा समावेश करणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच दररोज योगासने व प्राणायाम करावेत असे आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापक तुकाराम कापसे,आरोग्य सेवक आदित्य सातपुते, आशावर्कर मंगल क्षीरसागर, प्रविणकुमार लटके,तनुजा तांबोळी,शिवाजी भोगे, सुनील खोत,सचिन क्षीरसागर,सुधीर टोणगे,लहू गवळी,सागर राजगुरू यांच्यासह इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment