माढा शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता द्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

माढा शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता द्या

 माढा शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता द्या






माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहराच्या प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनेस तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच मनकर्णा नदीला कालव्याचा दर्जा देऊन सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून मनकर्णा नदीत पाणी सोडावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. माढा शहराच्या प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजुरी व निधी मिळावा यासाठी रणजितसिंह शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याची माहिती झुंजार भांगे यांनी दिली.

माढा शहराची सध्याची पाणीपुरवठा पाइपलाइन ग्रामपंचायत काळातील असून ती सुमारे ३० वर्षे जुनी आहे. त्यामुळे पाइपलाइन जीर्ण झाली असून वारंवार गळती होत आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत माढा नगरपंचायतीने ५२ कोटी ७५ लाख रुपयांचा सविस्तर पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास तांत्रिक मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेसाठी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे (डीएमए) सादर करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी नगरविकास विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न गंभीर

माढा तालुक्यात सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरातील पाणीपातळी वाढविण्यासाठी तसेच शेती व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मनकर्णा नदीला कालव्याचा दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर माढा शहराचा सिना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करून या योजनेतून मनकर्णा नदीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, नगरपंचायतीच्या गटनेत्या संजीवनी भांगे, नगरसेवक चंद्रशेखर गोटे आणि माजी नगरसेवक दिनेश गाडेकर यांच्या लेटरहेडवर देण्यात आले.

यावेळी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, नगरसेवक चंद्रशेखर गोटे, माजी नगरसेवक दिनेश गाडेकर, समर्थ भांगे, शिवरंग गोटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages