जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी व मैदानी स्पर्धेत लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे उल्लेखनीय यश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, कुमठेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सफा एजाज शेख हिने १७ वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला, तर शगुन शिवप्पा राठोड हिने १९ वर्षे वयोगटात कांस्यपदक (ब्राँझ मेडल) मिळवले. या दोन्ही विद्यार्थिनींची अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच सफा एजाज शेख हिने तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला असून, तिची पंढरपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एका विद्यार्थिनीने तलवारबाजी आणि मैदानी स्पर्धा अशा दोन्ही क्रीडा प्रकारांत मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने, सोलापूर महानगरपालिके चे नगरसेवक तथा संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने, संस्थेच्या विश्वस्त स्वातीताई माने, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार, शाळेचे समन्वयक मलकरी कोरे, माध्यमिक प्रशाला कुमठे व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक अंबादास रेडे, तसेच ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख संजय जाधव यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींना शाळेचे क्रीडाशिक्षक एनआयएस प्रशिक्षक विक्रम पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला आहे.

No comments:
Post a Comment