रुपाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचे आराध्यदैवत श्री रुपाभवानी मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सव यंदा ११ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता घटस्थापना व श्री देवीच्या नित्योपचार पूजेने होणार आहे. त्यानंतर नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज विविध धार्मिक विधींसह रात्री छबिन्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री रुपाभवानी देवळ ट्रस्टचे वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
११ ते २० ऑक्टोबरदरम्यान श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना होणार आहे. गुरूवार, १५ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीनिमित्त सायंकाळी ४.३० वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना होणार आहे.
रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीला अलंकार महापूजा केली जाणार आहे. यानिमित्त सायंकाळी ४ वाजता होमास प्रारंभ होऊन रात्री ८.४५ वाजता पूर्णाहुती होईल. तसेच सायंकाळी ७ वाजता मल्लिनाथ मसरे यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यानंतर नित्योपचार पूजा व रात्री छबिना होणार आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी महानवमीनिमित्त श्री देवीची अलंकार पूजा तसेच रात्री छबिना आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यादिवशी देवीची अलंकार पूजा करण्यात येते. सायंकाळी ४ वाजता श्री रूपाभवानी मंदिरातून श्री देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सार्वजनिक सीमोल्लंघन व शमीपूजनाचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेदिवशी सकाळी १० वाजता अलंकार महापूजा होणार असून त्यांनतर प्रसाद वाटप होणार आहे. त्यांनतर नित्योपचार पूजा होणार असून रात्री छबिनानंतर दूध प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचदिवशी शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात श्री रुपाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल होतात. भक्तांना धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेता यावा आणि नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी श्री रुपाभवानी देवळ ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभागी व्हावे, असे आवाहन मल्लिनाथ मसरे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस सुनील मसरे, अनिल मसरे, प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, बाळासाहेब मुस्तारे, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.
चौकट
भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियातर्फे श्री रुपाभवानी देवस्थान येथे नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १२ ते १९ ऑक्टोबरदरम्यान तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त २३ ते २५ ऑक्टोबरपर्यंत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार, रक्त तपासणी, कुटुंबनियोजन साधनांचे वाटप, पोस्टर प्रदर्शन तसेच कॅन्सर जनजागृती करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment