ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन

 ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचे भूमीपुत्र ,ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे ( वय ७६ ) यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी कमल व दोन मुले असा परिवार आहे. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशनचे व्यवस्थापकीस संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे हे त्यांचे पुत्र होत. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या वांद्रे पूर्व येथील घरी नेण्यात येणार असून त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत साडेअकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
    प्रताप आसबे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला होता. शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर ते युवक चळवळीकडे ओढले गेले. कॅपिटेशन फी विरोधातील आंदोलन, राशीनमधील शेतमजूरांसाठी राशीन कम्युनचा प्रयोग, त्यानंतर तत्कालिन मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन व मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन याच्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. याच काळात त्यांना काही काळ तुरूंगवासही भोगावा लागला. त्यानंतर आसबे यांनी पूर्णवेळ पत्रकारिता केली. प्रारंभी नवशक्ती व त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केले. महाराष्ट्र टाइम्समधील त्यांचा " महाराष्ट्र देशी " हा स्तंभ वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. निवृत्तीनंतर काही वृत्तवाहिन्यांवरही त्यांनी राजकीय विश्लेषकाची भूमिका बजावली.

 अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू, अनुभवी आणि राजकीय-सामाजिक घडामोडींचे सखोल विश्लेषण करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या विषयांवरील त्यांचे लेखन व विश्लेषण ही त्यांच्या पत्रकारितेची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.  पत्रकारितेत राजकीय घडामोडींचे वृत्तांकन करताना घटनांची तात्कालिकता महत्त्वाची असते; मात्र त्या घटनांचा दीर्घकालीन परिणाम समजून घेणेही तितकेच आवश्यक असते. प्रताप आसबे यांच्या लेखनातून हा व्यापक दृष्टिकोन दिसून येत असे.महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचा अभ्यास करताना त्यांनी विविध घडामोडींमधील परस्परसंबंध समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. राजकारण हे केवळ सत्तेचे गणित नसून त्याचा सामान्य नागरिकांच्या जीवनावरही परिणाम होत असतो, ही भूमिका त्यांच्या विश्लेषणातून ठळकपणे समोर येत असे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींच्या सखोल अभ्यासाचा गौरव केला.प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील एका अनुभवी अभ्यासकाला गमावले आहे. अनेक वर्षांच्या अनुभवातून विकसित झालेली त्यांची राजकीय समज, घडामोडींचा मागोवा घेण्याची पद्धत आणि लेखनातून व्यापक संदर्भ मांडण्याची हातोटी ही त्यांच्या कार्याची महत्त्वाची ओळख होती.त्यांच्या निधनामुळे आसबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आणि त्यांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना केली.
तीन दशकांहून अधिक काळ
पत्रकारितेचा अनुभव
प्रताप आसबे हे तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार होते. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींकडे केवळ दैनंदिन बातम्या म्हणून न पाहता, त्या घडामोडींचे व्यापक परिणाम समजून घेण्याची त्यांची दृष्टी होती. देशाच्या राजकारणातील बदल, राजकीय पक्षांची वाटचाल, सामाजिक संघर्ष, आर्थिक धोरणे आणि लोकशाही प्रक्रियेतील घडामोडी यांचा ते सातत्याने अभ्यास करीत असत.
त्यांच्या लेखनातून राजकीय घटनांच्या पाठीमागील संदर्भ, त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि समाजजीवनावर होणारे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न दिसून येत असे. त्यामुळे त्यांची ओळख केवळ वृत्तसंकलन करणारे पत्रकार म्हणून नव्हे, तर घडामोडींचा अर्थ उलगडून सांगणारे राजकीय विश्लेषक म्हणूनही निर्माण झाली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages