सोलापूर मनपाची थकबाकीदारांवर कारवाई; होटगी रोड, कुंभार वेसमधील ६ व्यापारी गाळे सील
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार संधी देऊन आणि रितसर नोटिसा बजावूनही थकीत भाड्याची रक्कम न भरल्याने होटगी रोड आणि कुंभार वेस परिसरातील सहा व्यापारी गाळे सील करण्यात आले. मनपाच्या या कारवाईमुळे थकबाकीदार गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेच्या अभय योजना २०२६-२७ अंतर्गत थकबाकी वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान खुल्या जागांचे भाडेधारक आणि व्यापारी गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र, नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने थेट जप्तीची कारवाई करत संबंधित गाळ्यांना सील ठोकले. या कारवाईची माहिती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
होटगी रोडवरील पाच, कुंभार वेसमधील एक गाळा सील
मनपा पथकाने केलेल्या कारवाईत कुंभार वेस येथील संतोष सुभाषचंद्र निरंकारी यांच्या गाळ्यावर ३७ हजार ७३४ रुपयांची थकबाकी असल्याने तो सील करण्यात आला. तसेच होटगी रोड परिसरातील वसंत फडके (२०,८०२ रुपये), वर्षा नितीन मस्के (२९,५४९ रुपये), रियाझ रमजानसाब शेख (२०,२३० रुपये), मच्छिंद्र दामोदर चौगुले (१७,२१४ रुपये) आणि पंकज व्हनकळस (१७,२७६ रुपये) यांच्या गाळ्यांवरही कारवाई करण्यात आली.
या सहा गाळेधारकांकडील एकूण थकबाकी १ लाख ४२ हजार ८०५ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
रक्कम भरताच काही गाळे सीलमुक्त
महानगरपालिकेने गाळे सील करण्याची कारवाई सुरू करताच काही मिळकतधारकांनी थकीत भाड्याची संपूर्ण रक्कम तातडीने जमा केली. संबंधित थकबाकी वसूल झाल्यानंतर प्रशासनाने या गाळ्यांचे सील काढून ते सीलमुक्त केले. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी मनपाने केलेल्या कारवाईचा परिणाम दिसून आला.
थकबाकी भरा, अभय योजनेचा लाभ घ्या!
थकीत भाडे असलेल्या सर्व गाळेधारकांनी आणि खुल्या जागा भाडेतत्त्वावर घेतलेल्या मिळकतधारकांनी थकीत रकमेचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे. अभय योजना २०२६-२७ चा लाभ घेऊन संभाव्य जप्ती व सील करण्यासारखी कारवाई टाळावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
थकबाकी वसुलीसाठी आगामी काळातही मोहीम सुरू राहणार असल्याने संबंधित मिळकतधारकांनी दुर्लक्ष न करता थकीत रक्कम भरावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
.png)
No comments:
Post a Comment