सोलापूरच्या ६८८ कोटींच्या उड्डाणपुलाचे काम मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 16, 2026

सोलापूरच्या ६८८ कोटींच्या उड्डाणपुलाचे काम मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता

 सोलापूरच्या ६८८ कोटींच्या उड्डाणपुलाचे काम मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील जुना पूना नाका ते पत्रकार भवन ते बोरामणी नाका या नऊ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या कामाला आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पासाठी ६८८ कोटी रुपयांची निविदा बिल्डकॉन कंपनीला मंजूर झाली आहे. मात्र, अद्याप कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) मिळालेला नसल्याने प्रत्यक्ष काम मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता महामार्ग विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

उड्डाणपुलाच्या निविदेची रक्कम जीएसटीसह सुमारे ८३० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय प्रकल्पाशी संबंधित अन्य कामांसाठी आणखी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे १,४०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

या उड्डाणपुलाचे भूमिपूजन २०१६ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रकल्पाचे काम अनेक वर्षे रखडले. या विलंबाबाबत गडकरी यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन जमीन संपादनासाठी विशेष मोहीम राबविली.

दरम्यान, राज्य सरकारच्या मालकीची जमीन महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मालकीच्या चार जागांचे हस्तांतरण अद्याप बाकी आहे. या जागांच्या हस्तांतरणासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार सुरू असून, अंतिम बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ही प्रक्रिया ऑक्टोबरअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणे आणि कार्यारंभ आदेश मिळणे या बाबींवर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची वेळ अवलंबून आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या उड्डाणपुलाच्या कामाला मार्चमध्ये सुरुवात होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages